दिल्ली निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काय करणार? काँग्रेसशी हातमिळवणी?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी महागठबंधन या आघाडीला भाजप विरोधात यश मिळवून दिलं होतं. 

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झालेले निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला विजय मिळवून दिला. केजरीवालांच्या हॅटट्रिकमध्ये पीके अर्थात प्रशांत किशोर यांचा वाटा मोलाचा आहे. आता या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसचा हात हातात धरणार असल्याची चर्चा सुरू झालीय. स्वतः प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसलाय. दिल्लीत आपला पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व राखता आलं. त्यात प्रशांत किशोर यांची रणतिनी फार महत्त्वाची ठरली. शाहीनबाग आंदोलनाचा मुद्दा देशपातळीवर चर्चेत आला असताना, प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना या विषयावर भाष्य न करण्याचा सल्ला दिला होता. केजरीवाल या आंदोलनापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. त्याचा त्यांना फायदाही झाला. संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. केजरीवाल यांच्या विजयानंतर त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

आणखी वाचा - गे डेटिंग ऍपच्या जाळ्यात अडकले बड्या कंपन्यांचे मासे 

हकालपट्टी का?
प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात आपलं स्थान भक्कम केलं होतं. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी महागठबंधन या आघाडीला भाजप विरोधात यश मिळवून दिलं होतं. पण, केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरकित्व नोंदणी या मुद्द्यावरून प्रशांत किशोर आणि संयुक्त जनता दलात मतभेद झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर आमच्यासोबत नसल्याची घोषणा केली. त्यानंतर पूर्व नियोजनाप्रमाणे प्रशांत किशोर दिल्लीच्या निवडणुकीत बिझी झाले होते.

आणखी वाचा - केजरीवालांचं यश भाजपला धडा

वर्षाअखेरीस बिहार निवडणूक
बिहारमध्ये येत्या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशांत किशोर या निवडणुकीत कोणाला साथ देणार याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी प्रशांत किशोर यांना राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले होते. दुसरीकडं काँग्रेसनं प्रशांत किशोर यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी अद्याप प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याचवेळी जर, प्रशांत किशोर यांनी आमच्याशी संपर्क साधला तर, त्यांचा निश्चित विचार केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दलात मी सहभागी होणार असल्याची चर्चा फुटकळ आहे. अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याविषयी मी येत्या 18 फेब्रुवारीला सगळं स्पष्ट करणार आहे. कृपया विषयी कोणतेही अंदाज लावू नका.
- प्रशांत किशोर, निवडणूक राणतिनीकार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant kishor reaction about joining with congress or rjd