'नमो टीव्हीवरील कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्‍यक' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय "नमो टीव्ही'वर कुठलाही कार्यक्रम प्रसारित करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिले आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय "नमो टीव्ही'वर कुठलाही कार्यक्रम प्रसारित करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिले आहेत. आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली.

आधीच चित्रीकरण करून सादर केल्या जाणाऱ्या नमो टीव्ही वरील सर्व कार्यक्रमांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. नमो टीव्हीला भाजपकडून निधीचा पुरवठा केला जात असल्यामुळे या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना दिल्लीतील माध्यम प्रमाणीकरण आणि नियंत्रण समितीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले होते.

तसेच पूर्वपरवानगी न घेता प्रसारित करण्यात आलेले कार्यक्रम तत्काळ हटविण्याचे निर्देशही आयोगाने दिले होते. 
नमो टीव्हीवरील कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

Web Title: Pre approval needs for Namo TV programs