कर्नाटकात होणार मुदतपूर्व निवडणुका?

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जून 2019

पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याची अमित शहा यांची योजना असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

बंगळूर : माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी अलीकडेच विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्‍यता वर्तविल्याने राज्यातील प्रमुख तिन्ही पक्षांत जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही काल (शुक्रवार) बदामीत कॉंग्रेस नेत्यांशी बोलताना कोणत्याही वेळी निवडणुकीला सज्ज राहण्याचे आवाहन केले व अप्रत्यक्षपणे मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले. 

बदामीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चिंतन बैठक झाली. बैठकीत ते म्हणाले, "या क्षणाला विधानसभेची निवडणूक घेतली, तरी कॉंग्रेस सत्तेवर येईल, हे निश्‍चित आहे. मात्र मी मुदतपूर्व निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक बोलावलेली नाही. राजकीय पक्षांनी कोणत्याही वेळी निवडणूक आली तरी त्याला सामोरे जाण्यास तयार राहिले पाहिजे. आमचे वर्चस्व कमी झाल्याचे श्रीरामलू सांगतात; परंतु हे सांगणारे ते कोण, याचा निर्णय जनताच देईल.'' 

कॉंग्रेसमार्फतच अहिंद संघटना करण्यात येणार असल्याचे सांगून सिद्धरामय्या म्हणाले, "मी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता आहे. त्यामुळे स्वतंत्र अहिंद संघटना करणार नाही. कॉंग्रेस पक्षातूनच अहिंद वर्गाला न्याय मिळवून देईन. भाजप कोणते ऑपरेशन कमळ करणार नाही. ऑपरेशन कमळ करणाऱ्यांचेच ऑपरेशन करण्याची आता वेळ आली आहे.'' 

पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याची अमित शहा यांची योजना असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. जरी निवडणूक झालीच, तर भाजप सत्तेवर येणार नाही हे निश्‍चित असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre elections to be held in Karnataka?