एटीएमच्या रांगेतच 'ती' झाली प्रसूत!

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

कानपूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकेत आणि एटीएम्सच्या बाहेर रांगा लागत आहेत. कानपूरमधील एका बॅंकेच्या बाहेर उभ्या असलेल्या गर्भवती महिलेने रांगेत एका बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कानपूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकेत आणि एटीएम्सच्या बाहेर रांगा लागत आहेत. कानपूरमधील एका बॅंकेच्या बाहेर उभ्या असलेल्या गर्भवती महिलेने रांगेत एका बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सर्वेशा देवी ही तीस वर्षांची गर्भवती महिला विकास खिंड झिंझक परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी रांगेत उभी होती. त्यासाठी तिला तीन तास रांगेत उभे राहावे लागले. दरम्यान रांगेत उभी असताना सर्वेशाला प्रसूतीवेदना होऊ लागल्या. त्यानंतर तिने एटीएमच्या परिसरातच एका मुलीला जन्म दिला. हा प्रकार पाहून एटीएमच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सर्वेशाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. नवजात बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र सर्वेशा अशक्त आहे. एटीएममधून पैसे काढण्याचा सर्वेशाचा हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वीही ती पैसे काढण्यासाठी रांगेत उभी होती. मात्र तिला पैसे मिळू शकले नव्हते. सर्वेशाचे पती अलिकडेच एका अपघातात निधन पावले होते. सर्वेशाला दोन मुली आणि तीन मुले आहेत.

मागील महिन्यात 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बॅंकेतून आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे बॅंकेतून आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लागत आहेत. या निर्णयाला एक महिना होत असतानाही बॅंकेतील आणि एटीएममधील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. एटीएममध्ये पैसे टाकल्यानंतर लोक पैसे काढण्यासाठी गर्दी करत असल्याने काही तासातच एटीएम "कॅशलेस' होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Pregnant women delivers baby standing outside ATM