12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ; वटहुकूमास राष्ट्रपतींची मंजूरी

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

16 वर्षांखालील मुलींवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची किमान शिक्षा 10 ऐवजी 20 वर्षे करण्यात आली आहे. दोषींना जन्मठेपेची शिक्षेची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याबाबत काल (शनिवार) केंद्र सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला. या वटहुकूमाच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्यात आला. केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती करण्यात आलेल्या वटहुकूमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवीन अध्यादेशानुसार 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. 

hang

देशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर केंद्र सरकार गंभीर असून, त्याला लगाम लावण्यासाठी सरकारकडून पावले उचण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याबाबत वटहुकूम केंद्र सरकारकडून काल काढण्यात आला. याशिवाय 16 वर्षांखालील मुलींवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची किमान शिक्षा 10 ऐवजी 20 वर्षे करण्यात आली आहे. दोषींना जन्मठेपेची शिक्षेची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी आढळल्यास किमान 20 वर्षांचा तुरूंगवास किंवा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या वटहुकूमामध्ये करण्यात आली आहे. 

दरम्यान, देशात विविध आर्थिक गुन्हे करून परदेशात पसार होणाऱ्या संबंधितांविरोधात कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबतच्या वटहुकूमावरही राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यापुढे आर्थिक गुन्हे करून परदेशात पळून जाणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: President Kovind okays ordinance seeking death penalty for Child rape