"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला राष्ट्रपतींची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

कोविंद यांच्या हस्ते झाले रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन...

केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या मूर्तीपासून पाच किलोमीटर अंतरावरील प्रस्तावित रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन कोविंद यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रपतींनी शनिवारी सकाळी "स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स'ची पाहणी केली. या ठिकाणी पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी वृक्षारोपणही केले. त्यानंतर कोविंद हे प्रार्थनासभेतही सहभागी झाले होते. राष्ट्रपतींनी नंतर "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली.

"स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे, त्यासाठी मुख्य लोहमार्गाला जोडणारा 32 किलोमीटरचा नवा लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे.

पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा असून, येथील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर तो उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.

Web Title: President Kovind Visits Statue Of Unity On Sardar Patel Death Anniversary