पंतप्रधान फक्त त्यांचीच 'मन की बात' ऐकतात : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

''पंतप्रधान मोदी आपली 'मन की बात' ऐकवतात हे सर्वांना माहित होते. मात्र, आज हेदेखील समजले की ते फक्त आपलीच 'मन की बात' ऐकणे पसंद करत आहे''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचा दावा गेल्या महिन्यात केला होता. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ''पंतप्रधान मोदी आपली 'मन की बात' ऐकवतात हे सर्वांना माहित होते. मात्र, आज हेदेखील समजले की ते फक्त आपलीच 'मन की बात' ऐकणे पसंद करत आहे''.

पंतप्रधान मोदींनी 20 जूनला छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात राहणाऱ्या चंद्रमणी या शेतकरी महिलेशी संवाद साधला होता. त्यादरम्यान मोदींनी त्यांना तुमचे उत्पन्न किती वाढले, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी चंद्रमणी यांनी माझे उत्पन्न दुपटीने वाढले असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या उत्तरानंतर चंद्रमणी यांचे उत्पन्न दुप्पट कसे झाले, याबाबत प्रश्नचिन्ह होते. असे असताना याबाबतची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी एका हिंदी वृत्तवाहिनीने छत्तीसगडमध्ये जाऊन चंद्रमणी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वास्तव समोर आले.

यादरम्यान, आपले उत्पन्न दुप्पट झाले नसल्याचे चंद्रमणी यांनी सांगितले. चंद्रमणी म्हणाल्या, मोदींच्या दौऱ्यापूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांचे पथक गावात आले होते. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी मोदींनी विचारलेल्या प्रश्नांना कशी आणि काय उत्तरे द्यायची याचे प्रशिक्षण दिले होते.

Web Title: The Prime Minister listens only to their mind says Rahul Gandhi