Vienna Terror Attack: दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का, भारत ऑस्ट्रियाबरोबर-PM मोदी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

हल्लेखोरांनी विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत

नवी दिल्ली- ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे अत्यंत दुःख झाले आहे. अशा वेळी भारत ऑस्ट्रियाबरोबर उभा आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असे टि्वट त्यांनी केले आहे. 

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे सोमवारी झालेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रियाच्या गृह मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात एक हल्लेखोर ठार झाल्याचे सांगण्यात येते.

हल्लेखोरांनी विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी टि्वट करुन एका संशयित हल्लेखोराचा खात्मा केल्याचे सांगितले. 

हेही वाचा- ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला, 7 जण ठार

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, या दहशतवाद्याच्या शरीरावर एक बॉम्ब बांधण्यात आला होता. त्याच्या शरीरावरील बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Modi condemned the terrorist attack in Vienna