मोदींचा 70 वा जन्मदिवस दणक्यात होणार साजरा; वाढदिवसाची थीमही ठरली

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावून मोदींचा वाढदिवस साजरा करण्याबाबत विचारमंथन केले.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला येणारा ७० वा वाढदिवस देशभरात "आत्मनिर्भर' या संकल्पनेभोवती देशभरात आरोग्य नियम पाळून पण दणक्‍यात साजरा करण्याची योजना भाजपने आखली आहे. याला जोडूनच येणाऱ्या जनसंघ नेते दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (१७ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर) आत्मनिर्भर थीमअंतर्गत हे कार्यक्रम राबविण्यात येतील.

गाडी रोखण्याचा योगायोग; पण देशमुखांप्रमाणे सत्‍तारांचेही होणार का?

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावून मोदींचा वाढदिवस साजरा करण्याबाबत विचारमंथन केले. पंतप्रधान मोदींना १७ सप्टेंबरला ७० वर्षे पूर्ण होतील. मागील वर्षी भाजपने यानिमित्त देशभरात सेवा सप्ताह साजरा केला होता. यंदा कोरोना महामारीचा प्रकोप असल्याने यानिमित्त रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरे, मास्क वितरण, लॉकडाउनमुळे रोजगार गमावलेल्या व इतरही गरीबांना अन्नदान आदी उपक्रम राबविण्याचे भाजपचे नियोजन आहे.

कोट्यवधी मास्कचे वितरण करून "स्वतः सुरक्षित रहा व दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा' हा संदेश भाजप देशवासीयांना देईल. या उपक्रमांत भरही पडू शकते असेही सांगण्यात आले. याच काळात संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू राहणार असल्याने त्याआधी मंगळवारी होणाऱ्या भाजप संसदीय बैठकीतच मोदींचा सन्मान करण्याचीही कल्पना काही भाजप नेत्यानी मांडली आहे.

100 रुपयांत करा आधार अपडेट; UIDAI ने जारी केली आवश्यक कागदपत्रांची यादी

सलग दोनदा भाजपला केंद्रात सत्ता मिळवून देणाऱ्या मोदी यांना वाढदिवसाचे जंगी सोहळे पसंत नसल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले. त्यामुळे भाजपतर्फे यानिमित्त आधी गुजरात व २०१४ नंतर देशभरात सामाजिक कार्यक्रम होत असतात. यंदा कोरोनाशी जोडून व आत्मनिर्भर संकल्पनेभोवती गुंफलेले सामाजिक उपक्रम पार पाडले जातील. महात्मा गांधीदेखील भारतातील आत्मनिर्भर गावांची संकल्पना मांडत असत. दीनदयाळ उपाध्याय यांनीही असेच विचार मांडले आहेत व मोदीही तेच करत आहेत, असेही या नेत्याने सांगितले. त्याचबरोबर २५ सप्टेंबरची दीनदयाळ उपाध्याय जयंती व २ ऑक्‍टोबरची गांधी जयंती यानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या काळात देशभरातील भाजप सरकारे व पक्षकार्यकर्ते विविध उपक्रम राबवतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister narendra modi birthday celebration