पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले : सोनिया गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले : सोनिया गांधी

नवी दिल्ली - निवडणुकीमधील पराभवाबद्दल कॉंग्रेस (Congress) पक्षाने फारसे बोलण्याचे टाळले असले तरी अध्यक्षा सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) आज प्रथमच यावर जाहीर भाष्य करताना कॉंग्रेसच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. तसेच या निकालांचा आढावा केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे सांगून सोनियांनी या बैठकीचे संकेत दिले. दरम्यान, कोविड व्यवस्थेवरुन (Covid Management) सोनिया गांधी यांनी सरकारवर (Government) टीका करत सरकारी व्यवस्था नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अपयशी (Unsuccess) ठरले आहेत, असे त्या म्हणाल्या. (Prime Minister Narendra Modi failed Sonia Gandhi)

कोरोनामुळे देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत सोनिया गांधींनी आज कॉंग्रेसच्या लोकसभेतील खासदारांसमवेत आभासी स्वरूपात चर्चा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली. या पाचपैकी तामिळनाडू वगळता चारही राज्यांमध्ये कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. केरळमधील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या प्रचाराची सर्व जबाबदारी राहुल गांधींकडे होती. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी बंगालमधील विजयासाठी ममता बॅनर्जींना, तमिळनाडूतील विजयासाठी एमके स्टॅलिन यांना आणि केरळमधील सत्ता कायम राखणाऱ्या डाव्या पक्षांना शुभेच्छा दिल्या. मात्र सर्व राज्यांमध्ये कॉंग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक आणि अनपेक्षित राहिली, अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसच्या पराभवाबद्दल नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून धडा शिकण्याची गरज असल्याचे खडेबोल पक्षाच्या रणनितीकारांना सोनियांनी सुनावताना केंद्रीय कार्यकारिणी या निकालांचा आढावा घेणार असल्याचेही स्पष्ट केले.

हेही वाचा: म्हणून करुणानिधींनी त्यांच्या मुलाचं नाव स्टॅलिन ठेवलं!

सहकार्याची ग्वाही

कोरोनाच्या व्यवस्थापनावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारवर प्रहार केले. देशाकडे अपरिमित साधने आणि शक्ती असताना सरकार त्यांचा वापर करण्यात पुरते अपयशी ठरले, असे सोनिया म्हणाल्या. कॉंग्रेसने सहकार्याची ग्वाही दिली असल्याचा संदर्भ देत सोनिया यांनी डॉ. मनमोहनसिंग व राहुल यांच्या पत्राचा उल्लेख केला. मात्र सरकार या सहकार्याबाबत उदासीन असल्याची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. आपले म्हणणे सरकारच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचले नसल्याची तिखट टिपणी करताना हा संघर्ष ‘आपण विरुद्ध सरकार असा नव्हे’ तर ‘आपण विरुद्ध कोरोना’ असा असल्याचे सोनिया म्हणाल्या.

निवडणूक निकालांच्या विश्लेषणासाठी लवकरच कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होईल. परंतु, सामुदायिकरीत्या आपण सर्वांनी नम्रतेने आणि प्रामाणिकपणाने या दणक्यापासून योग्य धडा शिकण्याची गरज आहे.

- सोनिया गांधी, अध्यक्षा कॉंग्रेस

Web Title: Prime Minister Narendra Modi Failed Sonia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top