पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या विमानांना संरक्षण कवच

पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या विमानांना संरक्षण कवच

वॉशिंग्टन : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या विमानांना आता लवकरच क्षेपणास्त्रांचे संरक्षण कवच मिळणार आहे. अमेरिकेने भारताला दोन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची तयारी दर्शविली आहे.

"बोइंग- 777' या विमानाला डोळ्यांसमोर ठेवूनच ही प्रणाली तयारी करण्यात आली असून, यासाठी 19 कोटी डॉलर एवढा खर्च येणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडूनच आज ही घोषणा करण्यात आली. भारत अमेरिका रणनीतीक संबंधांच्या विकासामध्ये हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही अमेरिकेकडून सांगण्यात आले. 

लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काउंटरमेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्‍शन सूट्‌स (एसपीएस) या दोन क्षेपणास्त्र प्रणालींच्या खरेदी व्यवहाराला अध्यक्ष ट्रम्प यांनीच मान्यता दिली आहे, असे अमेरिकेच्या "डिफेन्स सिक्‍योरिटी को-ऑपरेशन एजन्सी'ने बुधवारी अमेरिकी कॉंग्रेसमध्ये सांगितले. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या विमानावरील संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन भारताने अमेरिकेकडून ही प्रणाली विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. 

दर्जा सुधारणार 

या नव्या क्षेपणास्त्रप्रणालीमुळे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना दिली जाणारी "एअर इंडिया वन' दर्जाची सुरक्षा "एअर फोर्स वन'ची होणार आहे. ही व्यवस्था अमेरिकेच्या अध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेच्याच तोडीची आहे. दोन "बोइंग- 777' विमानांमध्ये संबंधित यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी "एअर इंडिया'कडून दोन "बोइंग- 777' विमाने खरेदी केली जाणार असून, ती व्यावसायिक कारणांसाठी वापरली जाणार नाहीत. 

अशी काम करेल यंत्रणा 

पार्टेबल क्षेपणास्त्रांपासून विमानाचे संरक्षण व्हावे म्हणून "एलएआयआरसीएएम' ही क्षेपणास्त्रप्रणाली तयार करण्यात आली असून, यामुळे संभाव्य हल्ल्याच्या इशारावेळेमध्ये वाढ होऊन चुकीचे इशारे दिले जाण्याचे प्रमाणही घटेल.

तसेच, शत्रूकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना ही यंत्रणा परस्पर उत्तर देते असे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्‌सने म्हटले आहे. बहुविध सेन्सॉरच्या वापरामुळे विमानाचे पूर्ण संरक्षण होते, तसेच शत्रूच्या क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर देण्यासाठी वैमानिकाला वेगळे श्रम घ्यावे लागत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com