काँग्रेसची हुकमी चाल; प्रियांका गांधी राजकारणात 

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

नवी दिल्ली : प्रियांका गांधी-वद्रा यांची आज कॉंग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनौपचारिक किंवा अंशतः राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रियंका यांचे सक्रिय राजकारणातले हे अधिकृत पदार्पण मानले जाईल. त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या विभागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश होतो ही उल्लेखनीय बाब आहे. लोकसभेची निवडणूक प्रियंका गांधी लढविणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह असले तरी ती शक्‍यता नाकारता येत नसल्याचे कॉंग्रेस वर्तुळातून सूचित करण्यात आले. 

प्रियांका गांधी यांच्या नेमणुकीमुळे कॉंग्रेस पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण पसरल्याचे स्पष्ट जाणवते. आतापर्यंत प्रियांका गांधी यांची राजकीय सक्रियता केवळ राहुल आणि सोनिया यांचे अमेठी व रायबरेली हे दोन मतदारसंघ सांभाळण्यापुरतीच मर्यादित होती. अर्थात पक्षात पद न घेता व पडद्याआड राहून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचा सहभाग होता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष व कॉंग्रेसमधील हातमिळवणीमध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. एवढेच नव्हे, तर ताज्या विधानसभा निवडणुकांनंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील नेता निवडीच्या प्रक्रियेत त्या संपूर्णपणे सक्रिय होत्या. त्यामुळेच आजच्या राजकारणात अधिकृतपणे सक्रिय होण्याच्या निर्णयातही राहुल, सोनिया आणि प्रियांका हे तिघेच सहभागी असल्याचे कॉंग्रेस अंतःस्थांनी सांगितले. कॉंग्रेसचे सरचिटणीस हे कॉंग्रेस कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे प्रियांका गांधी या आता कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये अधिकृतपणे सहभागी होतील. प्रियांका गांधी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्या फेब्रुवारीच्या सुरवातीला परतणार असून, त्यानंतर त्या जबाबदारी स्वीकारतील. 

प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. परंतु, सोनिया गांधी यांनी त्याबाबत फारसा प्रतिसाद न देण्याची भूमिका घेऊन राहुल गांधी यांना मात्र पूर्ण पाठबळ देऊन राजकारणात आणले होते. आता राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मात्र या कुटुंबाने हा निर्णय केला ही बाबही सूचक मानली जाते. कारण यापूर्वी राहुल यांच्या बरोबरीने प्रियांका गांधी यांनी राजकारणात सक्रिय होणे याचा अर्थ दोघांमध्ये राजकीय तुलना होणे आणि त्याचबरोबर पक्षातही दोन सत्ताकेंद्रे आणि त्यांचे गट असे चित्र निर्माण झाले असते व त्यामुळेच सोनिया गांधी अध्यक्ष असताना ही बाब टाळण्यात आली असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. 

"फ्रंटफुट'वर खेळणार 
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी समझोता झाला व त्यात कॉंग्रेसला समाविष्ट करण्यात आले नव्हते. त्या वेळी भाजपच्या उच्चवर्णीय मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी कॉंग्रेसला वेगळे ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अमेठी येथे बोलताना कॉंग्रेसने अजूनही समाजवादी व बहुजन समाज पक्षाबरोबरच्या संभाव्य हातमिळवणीबाबत अनुकूलता दाखवली. त्याचप्रमाणे त्यांच्या आघाडीबद्दलही काही प्रतिकूल शब्द त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र कॉंग्रेस बचावाच्या पवित्र्यात नाही आणि "फ्रंटफूट'वर जाऊन खेळणार असल्याचे सांगून त्यांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा निर्णय हा त्यांच्या आक्रमक राजकारणाचाच भाग असल्याचे सूतोवाच केले. 

ज्योतिरादित्यांवरही जबाबदारी 
प्रियंका गांधी यांच्या बरोबरीने गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांनाही पश्‍चिम - उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. हा सर्व पट्टा समाजवादी व बहुजन समाज पक्ष विरुद्ध भाजप यांच्यातील लढाईचा राहणार आहे. त्यामध्ये कॉंग्रेसला फारसे स्थान नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनाही तेथे फारसा वाव राहील अशी चिन्हे नाहीत. 

आझाद हरियानामध्ये 
अन्य बदलांमध्ये याआधी उत्तर प्रदेशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना हरियानाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कर्नाटकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या के. सी. वेणुगोपाल यांना कॉंग्रेस संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी राजस्थानात मुख्यमंत्री झालेले अशोक गेहलोत व त्यापूर्वी जनार्दन द्विवेदी सांभाळत होते. 

मोदींना शह देण्यासाठी.. 
प्रियांका गांधी यांच्याकडे असलेल्या पूर्व - उत्तर प्रदेशात लोकसभेचे सुमारे चाळीस मतदारसंघ येतात. लखनौचा मध्य उत्तर प्रदेशाचा परिसर आणि त्यानंतर पूर्वेकडे बिहारच्या सीमेपर्यंत लागून असलेला हा प्रदेश आहे. यामध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांचे प्रभावक्षेत्र असले तरी भाजप अत्यंत प्रबळ पक्ष मानला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गोरखपूर क्षेत्र हे याच पूर्व उत्तर प्रदेशात समाविष्ट होते. अमेठी व रायबरेली हे मतदारसंघ तर त्यांच्या क्षेत्रात येतातच; परंतु वरुण गांधी यांचा सुलतानपूर मतदारसंघही पूर्व उत्तर प्रदेशातच येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com