esakal | ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'
sakal

बोलून बातमी शोधा

ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

sakal_logo
By
विनायक होगाडे

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मैदानात उतरलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात भाजपने भवानीपूर मतदारसंघामध्ये प्रियांका टिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच ममतांविरोधात प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांचा समावेश असलेली स्टार प्रचारकांची फळीही उतरविण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. भवानीपूर मतदारसंघासोबतच पोटनिवडणूक होणाऱ्या समशेरगंज आणि जांगीपूर या दोन मतदारसंघामध्येही अनुक्रमे मिलन घोष तसेच सुजीत दास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भवानीपूर मतदारसंघामधून ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिब्रेवाल यांची उमेदवारी आज जाहीर झाली.

हेही वाचा: न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी निवडणूक कधीच हरलीय. त्यामुळेच तर भवानीपूरमध्ये पुन्हा एकदा पोटनिवडणूक होत आहे. त्यांनी भवानीपूरमधून आधीच निवडणूक जिंकलीय मात्र, त्यांना लोकांबद्दल आणि लोकशाहीबद्दल जराही पर्वा नाहीये. पुढे त्या म्हणाल्या की, तृणमूलमधील उमेदवाराला लोकांनी विजयी मते दिली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांना स्वत: निवडणूक लढवायची असल्याकारणाने त्यांनी त्याला हटवलं. ही इथल्या लोकशाहीची अवस्था आहे. त्यांना लोकांच्या मतांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल जराही आदर नाहीये, असं मत प्रियंका टिब्रेवाल यांनी व्यक्त केलंय.

व्यवसायाने वकील असलेल्या टिब्रेवाल या केंद्रात भाजपचे मंत्री राहिलेल्या आणि आता राजकारण संन्यासाची घोषणा करणाऱ्या बाबूल सुप्रियो यांच्या विधी सल्लागार होत्या. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. एप्रिल मे मध्ये झालेली विधानसभा निवडणुकही त्यांनी लढविली होती. मात्र तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध त्या ५८ हजारहून अधिक मतांनी पराभूत झाल्या होत्या.

हेही वाचा: सत्ता दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, पटोलेंचा पवारांवर हल्लाबोल

सहा वर्षांत मोठी जबाबदारी

प्रियांका टिबरेवाल या पेशाने वकील आहेत. त्या सर्वोच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालयात वकीली करतात. ७ जुलै १९८१ रोजी त्यांचा जन्म कोलकत्यात झाला. कायद्याचे शिक्षण त्यांनी कोलकत्यातील हाजरा महाविद्यालयातून केले आहे. यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सहा वर्षांनंतर २०२०मध्ये त्यांची नियुक्ती पश्‍चिम बंगालमधील भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली. राज्यात २०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिबरेवाल या एंटल्ली मतदारसंघातून उभ्या होत्या. तेथे त्यांनी ‘तृणमूल’च्या स्वर्ण कमल साहा यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. त्यांनी २०१५मध्ये महानगरपालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. तेथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता.

loading image
go to top