पंजाब, उत्तराखंड भाजपमध्ये असंतोषाचे वारे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जानेवारी 2017

कॉंग्रेससह इतर पक्षांतून आलेल्या आयाराम-गयारामांना भाजप नेतृत्वाने पहिली पसंती दिल्यानंतर उत्तराखंडमधील या पूर्वीच्या चारही सरकारांमध्ये काम केलेले निष्ठावंत भाजप व संघ कार्यकर्तेही भडकले आहेत.

नवी दिल्ली - विधानसभा रणधुमाळीसाठी भाजपच्या तिकिटांची पहिली यादी जाहीर होताच पंजाब व उत्तराखंडमध्ये असंतोषाचा वणवा भडकला आहे. पंजाबमध्ये तर प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनी एका तिकिटासाठी आपले पद पणाला लावताना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊ केला आहे. गोवा, उत्तराखंडमध्ये आपल्या मुलाबाळांसाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप नेत्यांनी पहिली यादी जाहीर होताच पक्षाला चारी मुंड्या चीत करण्याचा विडा उचलल्याची माहिती आहे. गोवा व उत्तर प्रदेशातूनही नाराजीचे स्वर उमटण्यास सुरवात झाली आहे. तिकिटांसाठी पक्षनेत्यांवर दबाव आणू नका, असा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर सल्ला चंडिगडपासून मुंबईपर्यंतचे भाजप नेते जुमानेनासे झाल्याचे चित्र आहे.

पंजाबमध्ये सांपला यांनी फगवाडा येथून आपल्या पसंतीच्या उमेदावारासाठी तिकीट मागितले होते. प्रत्यक्षात सोमप्रकाश यांना तेथून तिकीट जाहीर झाले. यामुळे भडकलेल्या सांपला यांनी सरळ प्रदेशाध्यक्षपदाचाच राजीनामा देण्याची इच्छा जाहीरपणे प्रदर्शित केली. हा उमेदवार बदलला नाही, तर प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्रिपद या दोन्हींचाही राजीनामा देण्याची धमकीच त्यांनी दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्याशी आपल्या "स्टाइल'ने काल रात्री व आजही चर्चा केली; पण सांपला यांचा संताप कमी होताना दिसत नाही. पंजाबमध्ये सर्वच्या सर्व 23 उमेदावारांची भाजपने घोषणा केल्यावर ठिकठिकाणी नाराजीचे मोसमी वारे वाहू लागले आहे. उत्तराखंडमध्येही तीच परिस्थिती आहे. बी. सी. खंडुरी वगळता लोकसभेत आलेल्या इतर तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना तिकिटे देण्याची मागणी भाजप नेतृत्वाने धुडकावली. त्यानंतर तेथे "बाहेर'च्या उमेदवारांच्या विरोधात प्रदेश भाजपमध्ये विरोध सुरू झाला आहे. कॉंग्रेससह इतर पक्षांतून आलेल्या आयाराम-गयारामांना भाजप नेतृत्वाने पहिली पसंती दिल्यानंतर उत्तराखंडमधील या पूर्वीच्या चारही सरकारांमध्ये काम केलेले निष्ठावंत भाजप व संघ कार्यकर्तेही भडकले आहेत. नरेंद्रनगरमधून ओ. पी. रावत यांनी तर हरिद्वारमधून सुरेशचंद्र जैन या माजी आमदारांनी बंडखोरी केली आहे.

उत्तर प्रदेशात जातच प्रभावी!
उत्तर प्रदेशात भाजपने 50 टक्के मतपेढीवर नजर ठेवताना मुस्लिम व काही प्रमाणात यादव या समाजघटकांना जमेसच धरले नसल्याचे चित्र आहे. 149 जणांच्या पहिल्या यादीत तर एकही अल्पसंख्याक उमेदवार नाही. 2014 मध्ये भाजपला ज्या 337 विधानसभा मतदारसंघांत दणदणीत बहुमत मिळाले होते, त्यावर भाजपने काटेकोर नियोजन केले आहे. पक्षसूत्रांनी वरिष्ठ नेत्यांचा हवाला देऊन आज सांगितले, की भाजपने उत्तर प्रदेशचे सहा प्रमुख विभाग केले आहेत. यात पश्‍चिम उत्तर प्रदेश, ब्रज, अवध, कानपूर, गोरखपूर व काशी यांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपने दहा टक्के ब्राह्मण, 33 टक्के गैर यादव व सात टक्के बिगर जाट मतदारांवर डोळा ठेवला आहे. याउलट सपने 20 टक्के यादव व 19 टक्के मुस्लिम (40 टक्के) आणि बसपने 13 टक्के जाट व 19 टक्के मुस्लिम मतपेढीला (30 टक्के) प्राधान्य दिल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

Web Title: problems for BJP in punjab, uttarakhand