कर्नाटकचा पेच आज तरी सुटणार? बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

कर्नाटक सरकारचा अखेर आज (ता. 19) पेच सुटेल. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आज दुपार पर्यंतची मुदत दिली आहे.

बंगळूर : कर्नाटक सरकारचा अखेर आज (ता. 19) पेच सुटेल. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आज दुपार पर्यंतची मुदत दिली आहे. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्रच पाठवले आहे.

कर्नाटकाच्या राजकीय नाट्याचे पडसाद देशभर पडत आहेत. विश्वासदर्शक ठरावाशिवायच विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. ज्याविरोधात भाजपा आमदारांनी ठिय्या आंदोलन केलं आणि रात्र विधानसभेतच घालवली.

कर्नाटकमधल्या 11 आमदारांनी राजीनामा दिला आणि कर्नाटकात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हा पेच काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांना सोडवता आला नाही.  

ज्यादिवशी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे तडकाफडकी अमेरिकेहून कर्नाटकात परतले होते. या सगळ्या सत्ता संघर्षात काँग्रेसने भाजपवर आरोपही केले. आमदारांना फोडण्यामागे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा हात असल्याचेही काँग्रेसने म्हटले होते. तर आमचा काँग्रेसच्या आणि जेडीएसच्या वादाशी काहीही संबंध नाही असे प्रत्युत्तर राजनाथ सिंह यांनी दिले होते.

आरोप प्रत्यारोपांच्या या सगळ्या फैरीनंतर विश्वासदर्शक ठरावासाठी 18 जुलै ही तारीख दिली होती. पण त्यादिवशी विश्वासदर्शक ठराव सादर झालाच नाही. ज्यामुळे भाजपा खासदारांनी कर्नाटक विधानसभेतच ठिय्या मांडला. तर रात्रही याच ठिकाणी घालवली. आता आज काय घडणार? हा प्रश्न कायम असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prove Majority By afternoon Today Karnataka Governor Tells Hdk Government