काहीही करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्या

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत अडचणी निर्माण न करता आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर प्रसंगी कर्जाऊ किंवा उधारीवरही (क्रेडिट) खत उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना केंद्र सरकारतर्फे आज सर्वत्र देण्यात आलेल्या आहेत. देशात सर्व प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि शेतकरी विविध स्वरूपात त्याची किंमत चुकती करुन खत खरेदी करु शकतात असे सरकारने आज जाहीर केले.

शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची उपलब्धता करुन द्यावी अशा सूचना सर्व राज्यांचे मुख्य सचिव, कृषी आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. सहकारी सोसायट्या, खासगी किरकोळ किंवा ठोक विक्रेते यांच्यामार्फत शेतकऱ्यांना खत उपलब्ध करुन दिले जावे आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही स्वरूपात किंमत चुकती करण्याची मुभा द्यावी असेही सांगण्यात आले आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक किंवा आवश्‍यकतेनुसार उधारीवरही खत द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रसायन व खत मंत्री अनंतकुमार यांनी दिली.

खत पुरवठा विना अडथळा आणि सुरळीतपणे व्हावा यासाठी केंद्रीय खत मंत्रालयाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीवर सतत देखरेख करणार आहेत. एक नोव्हेंबरअखेर युरियाची उपलब्धता 34.24 लाख मेट्रिक टन आहे. "डाय अमेनियम फॉस्फेट' (डीएपी) खताचाही 19.55 लाख मेट्रिक टन इतका साठा देशात आहे. पोटॅश (एमओपी) आणि नायट्रेट (एनपीके) खतेही अनुक्रमे 5.25 आणि 15.05 लाख मेट्रिक टन इतक्‍या प्रमाणात उपलब्ध आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: providing fertilizer to farmers