एक्झिट पोल : आचारसंहिता भंगाबद्दल दैनिकाविरुद्ध FIR

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 73 जागांसाठी मतदान झाल्यानंतर दैनिक जागरण या वृत्तपत्राने एक्‍झिट पोल प्रसिद्ध केला असून, यानुसार सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा बसपला मिळणार असून, त्यानंतर सप-कॉंग्रेस आघाडीला जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. 

नवी दिल्ली : मतदानोत्तर चाचणी (एक्‍झिट पोल) प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आज एका हिंदी दैनिकासह एजन्सीविरुद्ध उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यांत प्राथमिक तपास अहवाल (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले. 

आपल्या सूचनांचा भंग केल्याची गंभीर दखल घेताना निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कलम 126 (अ)चा हा थेट भंग असल्याचे म्हटले आहे. या गुन्ह्याखाली दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

रिसोर्स डेव्हलपमेंट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीवर आधारित घेतलेली मतदानोत्तर चाचणी दैनिक जागरण वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्याची दखल घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या प्रवक्‍त्याने दिली. 4 फेब्रवारी ते 8 मार्चपर्यंत कोणताही एक्‍झिट पोल दाखवता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने 27 जानेवारी रोजीच दिल्या होत्या. 

Web Title: Publication Of Exit Polls Violation Of Laws: Election Commission