पुलवामात चार दहशतवादी ठार 

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

- कथुआमध्येही हल्ल्याचा कट उधळला 
- सुरक्षा दलांनी जप्त केला मोठा शस्त्रसाठा 

 

श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही त्यांना प्रत्युत्तर देणे भाग पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त केला आहे. दरम्यान, हे दहशतवादी नेमके कोणत्या संघटनेशी संबंधित होते याची माहिती मिळालेली नाही.

दुसरीकडे कथुआ जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा जप्त करत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. दोन एके रायफली, हॅंड ग्रेनेड, 256 फैरींची चार मॅगझिन्स आणि स्नायपरसाठी वापरल्या जाणाऱ्या 59 फैरी जप्त करण्यात आल्या आहेत. येथील बिलावर ब्लॉकमध्ये सुरक्षा दले आणि स्थानिक पोलिसांनी एकत्रितरीत्या मोहीम राबवित हा स्फोटकांचा साठा जप्त केला असे संरक्षण विभागाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या शस्त्रसाठ्याबाबत सुरक्षा दलांना आधीच माहिती मिळाली होती. पॉलिथीन बॅगमध्ये गुंडाळून ही शस्त्रे एका खड्ड्यामध्ये फेकून देण्यात आली होती. 

जम्मूत बसस्थानकावर स्फोट 
येथील मध्यवर्ती बसस्थानकात अचानक झालेल्या स्फोटामुळे खळबळ निर्माण झाली होती, येथील पोलिस ठाण्याच्या दिशेने ग्रेनेड डागल्याने हा स्फोट झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, या स्फोटामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. अज्ञातांनी चालत्या वाहनातून हे ग्रेनेड डागले असावे, ते हवेतच फुटल्याने त्याचा स्फोट झाला असावा, असे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. या बस स्थानकावरील मागील सात महिन्यांतील हा दुसरा हल्ला आहे. 

Web Title: Pulwama Security forces gun down four terrorists