नंदनवनात रक्ताचा सडा

पीटीआय
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा

‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराजवळील लाटूमोड येथे दुपारी सव्वातीन वाजता झालेल्या या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत. सुमारे १०० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर धडकवून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे.

जम्मू-श्रीनगर हमरस्त्यावर हा भयानक हल्ला झाला. रजा संपवून कर्तव्यावर परतत असलेल्या जवानांसह ७८ वाहनांमधून सुमारे २५०० जणांचा ताफा काश्‍मीर खोऱ्याकडे निघाला असताना, हा प्रकार घडला. ‘जैशे महंमद’मध्ये गेल्या वर्षी दाखल झालेला आदिल अहमद दार हा या आत्मघातकी हल्ल्याचा सूत्रधार असून, तो पुलवामा जिल्ह्यातील काकापुराचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरपासून २० किलोमीटरवर आहे. स्फोटाच्या दणक्‍यामुळे जवानांच्या बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. बसमधील काही जवान तत्काळ तर काही रुग्णालयात उपचारादरम्यान, असे एकूण सर्व ३९ जवान हुतात्मा झाले.

अन्य अनेक बसचेही नुकसान झाले. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर गोळीबारही केला. जखमींमधील काही जवानांची प्रकृती गंभीर असून, त्यांना लष्कराच्या श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘सीआरपीएफ’चा ताफा जम्मूहून पहाटे साडेतीन वाजता निघाला होता आणि सूर्यास्तापर्यंत तो श्रीनगरमध्ये पोहोचणे अपेक्षित होते. खराब हवामान व अन्य प्रशासकीय कारणांमुळे जम्मू-श्रीनगर हमरस्ता गेले दोन दिवस बंद होता. त्यामुळे आज निघालेल्या ताफ्यातील जवानांची संख्या जास्त होती. नेहमी एका ताफ्यातून सुमारे एक हजार जवान जातात; पण दोन दिवस हमरस्ता बंद असल्यामुळे आज निघालेल्या ताफ्यात २,५४७ जवान होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ताफ्याच्या पुढे रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करणारे, तसेच चिलखती वाहनही होते. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बसमधील जवान ‘सीआरपीएफ’च्या ७६ व्या बटालियनचे होते. या बसमध्ये या बटालियनचे ३९ जवान होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती ‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजय कुमार यांनी दिली, तर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केल्याचे ‘सीआरपीएफ’च्या कारवाई विभागाचे महानिरीक्षक झुल्फिकार हसन यांनी सांगितले.

या हल्ल्यानंतर केंद्रीय पातळीवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असून, हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृह मंत्रालयाने नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे, तर ‘या घटनेमुळे राज्यातील २००४-०५ पूर्वीच्या स्थितीची आठवण येते,’ असे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ‘पीडीपी’च्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, दहशतवाद आणखी किती बळी घेणार, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तसेच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दुसरा मोठा हल्ला
उरीमधील लष्करी तळावर सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा आज झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. उरीतील ब्रिगेड तळावर चार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे १९ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले होते.

असा झाला हल्ला
    पहाटे ३.३० वा. जवानांच्या वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला.
    श्रीनगरपासून वीस किलोमीटर अंतरावर असताना अवंतीपुरा येथे ‘जैशे महंमद’च्या दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदत ताफ्यातील एका वाहनावर आपली गाडी धडकवली. 
    ताफ्यातील वाहनामध्ये ३९ जवान होते. स्फोटामुळे वाहनाचे तुकडे शंभर मीटरपर्यंत फेकले गेले. ताफ्यातील इतर वाहनांचेही नुकसान झाले. 
    काही गाड्यांवर गोळ्यांच्याही खुणा. लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांनीही गोळीबार केल्याची शक्‍यता.
    दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटके कशी आणि सुरक्षा यंत्रणा कशी भेदली, याचा तपास सुरू.

हल्ल्यानंतर काय? 
    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आवश्‍यक सूचना दिल्या. 
    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची उद्या 
    (ता. १५) सकाळी बैठक.
    राष्ट्रीय तपास पथकाचे बारा अधिकारी घटनास्थळाकडे रवाना. 
    हल्ल्यानंतर राज्यभर कडक बंदोबस्त 
    दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध
    वार्तांकन करताना माध्यमांनी कोणाला चिथावणी मिळणार नाही, अशी जबाबदारीपूर्ण विधाने करावीत असे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे प्रसार माध्यमांना आवाहन

रात्री शोपियाँमध्ये हल्ला
पुलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा धक्का बसला असतानाच शोपियाँ जिल्ह्यातही दहशतवाद्यांनी दुसरा हल्ला केला. येथील किगम पोलिस ठाण्यावर काही दहशतवाद्यांनी बंदुकीतून दोन ते तीन फैरी झाडल्या. येथे तैनात जवानांनी तातडीने प्रत्युत्तर देताच दहशतवादी पळून गेले. जवानांनी परिसराची नाकेबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. हा मोठा हल्ला नसला तरी पुलवामातील घटनेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे.

थंड डोक्‍याने धडा शिकवा! - शशिकांत पित्रे (निवृत्त मेजर जनरल)
गेल्या वर्षात भारतीय लष्कराने सुमारे २५० पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, त्यात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे १९ स्थानिक कमांडर होते. ते निःसंशय मोठे यश होते. काही गौण घटना वगळता काश्‍मीर खोरे बरेचशे शांत होते. परंतु केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर झालेला भ्याड आणि भीषण हल्ला पाहता ही केवळ वादळापूर्वीची शांतता ठरली आहे. 

‘आता हे खूप झाले’ असे म्हणायची वेळ आली आहे काय? जम्मू-काश्‍मीर महामार्ग (एनएच-१) ही काश्‍मीर खोऱ्याला ऊर्वरित भारताशी जोडणारी एकमेव जीवनरेखा आहे. त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते. लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी आणि दरम्यान घेण्याच्या खबरदारीबद्दल एक परिपूर्ण कार्यपद्धती (standard operating procedure) घालून देण्यात आली आहे. त्याचे दक्षतापूर्वक पालन केले, तर असे प्रसंग टाळता येतात. 

‘सीआरपीएफ’च्या ताफ्यामध्ये ७८ गाड्या आणि सुमारे २५०० जवान होते. इतका मोठा ताफा नेण्यात काही हलगर्जीपणा झाला आहे काय, याची कसून चौकशी व्हायला हवी. 

पण त्याचबरोबर दोन विशेष बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. पहिली बाब, त्या भागात गेले काही दिवस बर्फ पडत असल्याने वातावरण खराब आहे. आणि याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतलेला दिसतो. दुसरी बाब म्हणजे, हा एक आत्मघातकी हल्ला आहे, त्यामुळे त्यातील लवचिकता, आश्‍चर्यजनकता व अचानकपणाचा फायदा दहशतवाद्यांना झाला. ‘जैशे महंमद’ या हल्ल्याचा कट गेले दोन-तीन महिने आखत असणार. हे काही एकट्यादुकट्याचे काम नाही, याची माहिती किंवा कुणकुण लागली नसेल तर ते गंभीर अपयश आहे. या मुद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

पण पुढे काय? उरीनंतर पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याचा पायंडा पाडला आहे. हल्ल्यामागे ‘जैशे महंमद’ ही दहशतवादी संघटना आहे. ती पाकिस्तानमधून कारवाया करते, हे तर जगजाहीर आहे. हे सगळे लक्षात घेता उरीनंतर पुन्हा दुसरा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणार का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे समाधानकारक उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण असा हल्ला कोणताही उतावीळपणा न करता, अत्यंत थंड डोक्‍याने, आपण निवडलेल्या जागी, आपण निवडलेल्या वेळी आणि आपण ठरविलेल्या संख्येत केला पाहिजे. त्यातील सर्वांत अग्रगण्य घटक म्हणजे ‘तो हल्ला यशस्वी होईल’, याबद्दल तसूभरही संशय असता कामा नये. याला बराच वेळ लागू शकेल; परंतु या भ्याड क्रूरतेचे फळ ‘जैशे महंमद’ आणि परभारे पाकिस्तानला भोगावे लागेल, याची बरीच शाश्‍वती आता वाटायला हरकत नाही. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

हा हल्ला निंदनीय आहे. आमच्या शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या प्रसंगी शूर हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण राष्ट्र उभे आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पुलवामामध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. 
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध; जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो
- राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pulwama terror attack 39 crpf jawans martyred