esakal | पुलवामा हल्ल्यासाठी किती खर्च आणि कुठून आली रक्कम? NIA ने दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

pulwama attack

पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला होता. त्यासाठीची रक्कम मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळामध्ये पाच टप्प्यांमध्ये भारतात आली होती.

पुलवामा हल्ल्यासाठी किती खर्च आणि कुठून आली रक्कम? NIA ने दिली माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- मागील वर्षी जम्मू- काश्‍मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी दहशतवाद्यांनी ५.७ लाख रुपये एवढा खर्च केला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिली आहे. ‘एनआयए’ने या हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र सादर केले असून त्यामध्ये जैश-ए- मोहंमद ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या मोहंमद उमर फारूख या दोघांवर ठपका ठेवला आहे. फारूख हा कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा नातेवाईक आहे. 

पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला होता, त्यासाठीची पाकिस्तानी चलनात दहा लाख रुपये एवढी रक्कम मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळामध्ये पाच टप्प्यांमध्ये भारतात आली होती. ही रक्कम उमर फारूख याच्या बँकेतील खात्यावर जमा झाली होती. अॅलिड बँक आणि मिझान बँक या दोन संस्थांमधील फारूखच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. उमर फारूखने रौफ असगर अल्वी आणि अम्मार अल्वी या दोघांकडून हे पैसे मागविले होते. या पैशांचा जम्मू- काश्मीरमध्ये नेमका कसा वापर करण्यात आला याचा आम्ही अभ्यास करत आहोत असे ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

हे वाचा - भारत इस्राईलकडून खरेदी करणार 'अवास्क'; पाक आणि चीनवर ठेवणार करडी नजर

गाडीमध्ये सुधारणा केल्या 
पैसा भारतात आणण्यासाठी दहशतवाद्यांनी आर्थिक देवाणघेवाणीचा पारंपरिक मार्ग टाळत, विविध ठिकाणांवरून हा पैसा बँक खात्यांमध्ये जमा केल्याचे उघड झाले आहे. या व्यवहारामध्ये कोठे हवाला मार्गाचा वापर झालेला नाही ना? याचा देखील तपाससंस्था शोध घेत आहेत. आरोपपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला घडविण्यासाठी ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी १.८५ लाख रुपयांना मारुती इको व्हॅन विकत घेतली होती. या गाडीतून स्फोटके वाहून नेणे सोपे व्हावे म्हणून तिच्यात काही तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यात आल्या होत्या, यासाठी ३५ हजार रुपये एवढा खर्च आला होता. स्फोटकांच्या खरेदीसाठी २.२५ लाख रुपये आणि ॲल्युमिनियम खरेदीसाठी ३५ हजार रुपये खर्च केले होते.

आधीच घुसखोरी 
दहशतवाद्यांनी चार किलो एवढे ॲल्युमिनियम हे श्रीनगरमधील दहशतवादी वैज-उल-इस्लाम याच्या घरातून मिळवले होते. सुरक्षा दलांनी त्याला अटक केली आहे. या आरोपपत्रामध्ये जैश-ए- मोहंमद या दहशतवादी संघटनेने २०१८-१९ या काळात भारतात घुसखोरी करण्यासाठी नेमक्या कोणत्या मार्गांचा अवलंब केला त्याची सविस्तर माहिती दिली आहे. यातील पाच दहशतवाद्यांना जम्मूच्या सांबा सेक्टरमधून काश्‍मीरमध्ये आणण्याचे काम इकबाल राठेर याने केले होते असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

‘एफबीआय’ची मदत 
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमधून १४ एप्रिल २०१८ रोजी घुसखोरी केल्याचा संशय तपाससंस्थांना आहे. पुलवामातील हल्ल्यानंतर उमर फारूख याला आणखी हल्ले घडवून आणायचे होते पण भारताने यानंतर तातडीने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये कारवाई केल्याने त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. पुलवामाच्या हल्ल्यानंतर जैशने पाठविलेले मेसेज ट्रॅक करण्यासाठी एनआयएने अमेरिकीची तपाससंस्था एफबीआयची देखील मदत घेतली होती.