'CISCE'च्या परीक्षेत पुण्याची मुस्कान देशात प्रथम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 मे 2017

यंदा झालेल्या आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा किरकोळ वाढ झाली आहे, असे परिषदेच्या कार्यकारी अधिकारी गेरी अरथून यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षेत 97.73 टक्के मुली, तर 95.39 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

नवी दिल्ली : कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट्‌स एक्‍झामिनेशन (सीआयएससीई) ने आज बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यात पुन्हा मुलींनी बाजी मारली. बारावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 96.47, तर दहावीचे हेच प्रमाण 98.53 टक्के इतके आहे.

बारावीच्या परीक्षेत कोलकताच्या अनन्या मैती हिने 99.5 टक्के मिळवीत देशात प्रथम क्रमांक पटकाविला, तर पुण्याच्या मुस्कान अब्दुल्ला पठाण आणि बंगळूरूच्या आश्‍विन राव यांनी दहावीच्या परीक्षेत 99.4 टक्के मिळवून देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला. यंदा झालेल्या आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा किरकोळ वाढ झाली आहे, असे परिषदेच्या कार्यकारी अधिकारी गेरी अरथून यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षेत 97.73 टक्के मुली, तर 95.39 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

सीआयएससीईची बारावीची परीक्षा देशभरातील 988 शाळांमधून घेण्यात आली होती. त्याला 73 हजार 633 विद्यार्थी बसले होते. 50 लेखी विषयांमधील 16 भारतीय, पाच परदेशी आणि एक शास्त्रीय भाषेतून परीक्षा घेण्यात आली होती. आयुशी श्रीवास्तव (लखनौ), देवेश लखोटिया (कोलकता), रिक्षिका धारिवाल (मुंबई) आणि किरथाना श्रीकनथ (गुरगाव) हे संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहिले असून, त्यांना प्रत्येकी 99.25 टक्के गुण मिळाले आहेत. अनंत कोठारी (कोलकता), दीप्ती एस (डेहराडून), सौगत चौधरी (कोलकता), वेदांशी गुप्ता आणि युक्ता मीना (लखनौ) यांना प्रत्येकी 99 टक्के गुण मिळाले.

दहावीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली असून, 99.03 टक्के मुली तर 98.13 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. देशभरात दोन हजार 106 शाळांमधून झालेल्या या परीक्षेला एक लाख 75 हजार 299 विद्यार्थी बसले होते. 57 लेखी विषयांमधून झालेल्या या परीक्षेत 22 भारतीय भाषा, 9 परदेशी भाषा आणि एक शास्त्रीय भाषेतून परीक्षा घेण्यात आली. मुंबईची फरझन होशी भरूच आणि परगण्याची देवश्री पाल या दोघींनाही 99.2 टक्के गुण मिळवून द्वितीय स्थानी आल्या. केरळची मीनाक्षी एस. आणि पुण्याची राघव सिंघल हे 99 टक्के मिळवून तृतीय स्थानी आले.
विभागानुसार बघितल्यास दक्षिण विभागाने बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे, तर दहावीच्या परीक्षेत दक्षिण आणि पश्‍चिम विभागाने बाजी मारली आहे. परदेशात असलेल्या शाळेतही दोन्ही परीक्षांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्यासाठी अभ्यासक्रमाचा कोड निवडावा लागेल त्यानंतर युनिक आयडी आणि कॅप्शन टाकून नंतर शो रिझल्ट हे बटन दाबल्यानंतर निकाल बघता येईल. त्याशिवाय त्यांना प्रिंटआउटही काढता येईल.

Web Title: pune news muskan topper CISCE exam