Protest Against Farm Laws : शेतकरी आंदोलकांनी फेकले बॅरिकेट्स; पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती कायदा आणि करार शेती कायदा अशा या तीन कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. 'दिल्ली चलो मोर्चा' असं या आंदोलनाचे नाव आहे. हे सगळे शेतकरी  अंबालाच्या शंभू बॉर्डरवर एकत्र जमले आहेत. पण त्यांना अडवण्यासाठी ही बॉर्डर सील केली आहे. पण तरीही शेतकरी आपल्या निश्चयावर ठाम असलेले दिसून येत आहेत. पंजाबमधून हजारो ट्रॅक्टरमधून रेशन, पाणी, डिझेल तसेच औषध अशा सगळ्या लवाजम्यासह हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास तयार आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अंबाला-कुरुक्षेत्र या नॅशनल हायवेवर अडवलं आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स उचलून थेट फ्लायओव्हरवरुन खाली फेकून दिले आहेत. 

हेही वाचा - 'आम्ही भारताचे लोक'; कसे साकार झाले 'संविधान'?

कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अडवण्यात येत असल्याने त्यातील काहींनी दगडफेकही केल्याची माहिती समोर येतेय. पंजाब आणि हरियाणाच्या दरम्यान येणाऱ्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिस सातत्याने अश्रुधूराचा वापर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एंट्री पॉइंट्सवर जवान तैनात केले गेले आहेत. जवळपास 900 पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. सात जागांवर नाकाबंदीक करुन अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याठिकाणी अश्रूधुराच्या 2-2 गाड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तीन रिझर्व्ह पोलिस दल दंगलविरोधी उपकरणांसोबत उपस्थित आहेत.

अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती कायदा आणि करार शेती कायदा अशा या तीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे. केंद्र सरकारकडून आणलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचं सांगत विरोधकांकडून याला विरोध केला होता.

या विधेकयावरून एनडीएतील घटक पक्ष अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी राजीनामा देत विधेयकाला विरोध केला होता. काँग्रेस पक्षानेही पंजाब-हरियाणा राज्यात 'ट्रॅक्टर रॅली'चे आयोजन करत या कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आपलं समर्थन जाहीर केलं होतं. राहुल गांधी यांनी दोन दिवसीय यात्रा करुन आपला पांठिबा व्यक्त केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punjab haryana farmers move towards delhi to Protest Against Farm Laws