पंजाबमध्ये काँग्रेसची बाजी; सनी देओलच्या मतदारसंघात भाजपचा भोपळा

टीम ई सकाळ
Wednesday, 17 February 2021

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली आहे. राज्यातील अनेक नगरपालिका, पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून भाजपला धक्का बसला आहे.

चंदिगढ - पंजाबमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा फायदा राज्यात काँग्रेसला होत असल्याचं दिसत आहे. आंदोलनात पंजाबचे शेतकरी पुढे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. राज्यातील अनेक नगरपालिका, पंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून भाजपला धक्का बसला आहे. 

भाजप खासदार सनी देओलच्या मतदारसंघात काँग्रेसनं विरोधकांचा धुरळा उडवला. गुरुदासपुरमध्ये सर्वच्या सर्व 29 वॉर्डात काँग्रेसनं बाजी मारली. गुरुदासपुरशिवाय पठाणकोट, भटिंडा, कपूरथाला इथंही काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. पठाणकोटमध्ये 50 पैकी 13, भटिंडात 25 आणि कपूरथालामध्ये काँग्रेसनं एकतर्फी विजय मिळवला. अनेक नगर पालिकेत भाजप, अकाली दल यांच्यापेक्षा अपक्ष उमेदवारांची कामगिरी सरस आहे.

हे वाचा - सिंघू बॉर्डरवर पोलिसावर तलवार हल्ला; कार चोरून पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी

फरीदकोट नगर पालिकेतही काँग्रेसनं मोठा विजय मिळवला आहे. 25 वॉर्डापैकी 16 जागांवर काँग्रेस जिंकले असून अकाली दलाने 7 जागा राखल्या आहेत. याशिवाय आपला एक आणि अपक्ष एका उमेदवाराचा विजय झाला. 

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही काँग्रेसनं त्यांची कामगिरी कायम राखली आहे. 2017 मध्ये काँग्रेसनं पाटियाला, अमृतसर, जालंधर नगर पालिकेत विजय मिळवला होता.  केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात पंजाब आघाडीवर आहे. याचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत होताना दिसत आहे.

हे वाचा - राहुल गांधींनी दलित मुलीशी करावं लग्न; 'हम दो, हमारे दो'वरुन रामदास आठवलेंचा सल्ला

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक चाचणीच आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला 117 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये 109 नगर परिषद, नगर पंचायत आणि नगर पालिकांचा समावेश आहे. यामध्ये अबोहर, बठिंडा, बाटला, कपूरथाला, मोहाली, होशियारपूर, पठाणकोट आणि मोगा या 8 नगर पालिकांचा समावेश आहे. तसंच 109  नगर परिषदांच्या 2252 वॉर्डांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punjab municipal election results 2021 congress bjp sunny deol akali dal