Pushpam priya
Pushpam priya

Bihar Election : भल्याभल्यांना टक्कर देणारी पुष्पमप्रिया; मुख्यमंत्री पदासाठी केला दावा

बिहारच्या निवडणुकीत भल्याभल्यांनी आपली ताकद पणाला लावलीय. पण आता या भल्याभल्यांना टक्कर देण्यासाठी बिहारमध्ये एक रणरागीणी उभी ठाकली आहे. बिहारच्या सगळ्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर मोठाली जाहिरात छापून या रणरागीणीने स्वत:ला बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार म्हणून घोषित केलं आणि अनोख्या आणि हटके अंदाजाने आपली एन्ट्री घेतली. 

या युवतीचं नाव आहे पुष्पम प्रिया चौधरी. बिहारच्या जनतेला या रणरागीणीचं दर्शन झालं ते असं वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरील मोठ्या जाहिरातीतून. त्यानंतर पुष्पम प्रिया बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय दिसून आल्या. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्या बिहारच्या विकासासाठीचा रोडमॅपबद्दल चर्चा करताना दिसून येतात. त्या नेहमीच काळ्या कपड्यात दिसून येतात.

राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या या पुष्पम प्रिया चौधरींनी 'प्लुरल्स पार्टी' नावाची एक पार्टी स्थापन केली आणि स्वत:ला थेट मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच जाहीर करुन टाकले. आता ही युवती बिहारच्या रस्त्या-रस्त्यावरुन आणि गल्लोगल्लीत फिरुन परिवर्तनासाठी मत द्या असं म्हणत प्रचार करत आहेत. 

लंडनमध्ये शिकल्या आहेत पुष्पम प्रिया चौधरी
पुष्पम प्रिया दरभंगा जिल्ह्यात राहतात. जेडीयूचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य असलेल्या विनोद चौधरी यांच्या त्या कन्या आहेत. 'प्लुरल्स'च्या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पुष्पमने लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली आहे. प्लूरल्स पार्टीचे निवडणूक चिन्ह पंख लावलेला घोडा आहे आणि बिहारच्या जनतेला त्या याच उडणाऱ्या घोड्याच्या गतीने परिवर्तनाची आशा दाखवत आहेत. 

पुष्पम यांचं म्हणणं आहे की त्या बिहार राज्यासाठी सकारात्मक राजकारण करणार आहेत. बिहारच्या मुख्यमंत्री बनल्यावर पुढील दहा वर्षांपर्यंत त्या बिहारला सर्वांत विकसित राज्य बनवतील, असा दावा त्या करत आहे. पुष्पमच्या म्हणण्यानुसार, 2030 पर्यंत बिहारला युरोपिय देशांच्या बरोबरीने विकसित केलं जाईल.  

बांकीपूर विधानसभा जागेवरुन मैदानात

पुष्पम प्रिया चौधरी या पाटणाच्या बांकीपुर विधानसभा जागेवरुन निवडणुक लढवणार आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी मार्चमध्येच आपल्या जनसंपर्क अभियानाची सुरवात नितीश कुमार यांच्या नालंदा जिल्ह्यातून केली. बिहारच्या  बदलाची भाषा करणाऱ्या पुष्पम यांचं वय 28 वर्षे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com