US Election : फेसबुक सावध पवित्र्यात; 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना दिला डच्चू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये फेसबुकने मतदारांना संभ्रमित केल्याचा आरोप झाला होता. 

पॅरिस : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीची घौडदौड जोमाने सुरु आहे. रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्यात ही चुरशीची लढत आहे. दर चार वर्षांनी 1 नोव्हेंबरनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी या निवडणुका  पार पडतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जो बायडेन हेच या निवडणुकीत आघाडीवर आहेत, असं निवडणुकीपुर्वीची अनेक सर्व्हे सांगतायत. अशा पार्श्वभूमीवरच फेसबुककडून एक महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा - पॅरिसमध्ये शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी नऊ जणांना अटक

फेसबुकचे व्हॉईस प्रेसिंडेट निक क्लेग यांनी सांगितलं की, फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवरील 22 लाख जाहीरातींना रद्द केलं गेलं आहे. सोबतच 1,20,000 अशा पोस्टना काढून टाकण्यात आलं आहे, जे मतदान करताना अडथळा आणू शकतात. याशिवाय, चुकीची माहिती प्रसारित करण्यावरुन 150 दशलक्ष पोस्टना सुचना देखील पाठवली गेली आहे. 

2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. फेसबुकने मतदारांना संभ्रमित केल्याचा आरोप लावला गेला होता. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवरच फेसबुक सावधानी बाळगत असल्याचं बोललं जातंय. 2016 मध्ये ब्रिटनमध्येही याच प्रकारची समस्या उद्भवली होती. 

हेही वाचा - चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

या प्रकरणी, निक क्लेग यांनी म्हटलं की, आमचे 35 हजार कर्मचारी आमच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षा ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. या निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात यासाठी ते झटत आहेत.  आम्ही माहिती मिळविण्यासाठी 70 विशेष मीडिया गटांसोबत काम करत आहोत, ज्यातील पाच गट हे फ्रान्समधील आहेत. 

अमेरिकेच्या निवडणुका येत्या 3 नोव्हेंबर रोजी पार  पडणार आहेत. अमेरिकेच्या या निवडणुकीपूर्वी तीनपैकी एक प्रेसिडेंन्शियल डिबेट पार पडली असून एक रद्द झाली आहे. एक डिबेट नियोजित आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन आमनेसामने आहेत. हि निवडणुक डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. सगळ्या जगाचे लक्ष या निवडणुकीवर लागून राहिले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook Nick Clegg informed that facebook withdraws 22 lakh suspicious ads us election