शहांना घेरण्याची काँग्रेसची रणनिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जानेवारी 2018

न्यायपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणून नोंद झालेल्या चार न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेस पक्षाच्या पातळीवर सकाळपासूनच हालचाली गतीमान झाल्या होत्या. नेत्यांच्या व्यक्तिगत पातळीवरील सावध प्रतिक्रियांव्यतिरिक्त पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांच्या बंडाच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला, विशेषतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना घेरण्याची रणनिती आखली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे सरसावत,"न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च पातळीवर चौकशी करावी,' अशी मागणी केली. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूवरून राजकीय वावटळ उठली आहे. 

न्यायपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना म्हणून नोंद झालेल्या चार न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेनंतर कॉंग्रेस पक्षाच्या पातळीवर सकाळपासूनच हालचाली गतीमान झाल्या होत्या. नेत्यांच्या व्यक्तिगत पातळीवरील सावध प्रतिक्रियांव्यतिरिक्त पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. परंतु, या प्रकरणावर राहुल गांधीच्या निवासस्थानी वरिष्ठ वकील नेत्यांची बैठक झाल्यानंतर कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीत कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, सलमान खुर्शीद, के.टी.एस. तुलसी, मनीष तिवारी, विवेक तनखा त्याचप्रमाणे वरिष्ठ नेते अहमद पटेल आदी हजर होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांची न्यायपालिकेनेच सोडवणूक करावी, असे आवाहन करण्याबरोबरच न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याबाबत न्या. गोगोई यांनी केलेल्या विधानाच्या आधारे भाजप सरकारला घेरण्याचेही यात ठरले. 

Web Title: Questions Supreme Court Judges Raised Need To Be Looked Into Says Rahul Gandhi