केरळमध्ये आरजेची हत्या, मित्र गंभीर जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

राजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले.

तिरूअनंतपुरम (केरळ) : येथील प्रसिद्ध रेडीओ जॉकी रसिकन राजेश यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र देखील होता. त्याच्यावरही जिवघेणा हल्ला करण्यात आला. तो सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. राजेश त्यांच्या स्टुडिओमध्ये आले असता मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला. 

रसिकन राजेश (वय 36) हे केरळमधील प्रसिद्ध रेडिओ चॅनलवर आरजे म्हणून काम करत होते. त्याचबरोबर ते मिमिक्री आर्टिस्ट व गायकही होते. ही घटना सोमवारी रात्री दोनच्या सुमारास, मदवूर पल्लीकल येथील राजेश यांच्या मेट्रो स्टुडिओमध्ये घडली. राजेश व त्यांचा मित्र कुट्टन हे रात्री एक स्टेज शो संपवून आपल्या स्टुडिओमध्ये सामान ठेवण्यासाठी परतले असता, लाल रंगाच्या मारूती स्विफ्ट गाडीतून अज्ञात इसमांनी येऊन तीक्ष्ण हत्यारांनी त्या दोघांवर वार केले. त्यांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनी जाग आली व त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले, मग दोघांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले.

पेरिपल्ली येथील रूग्णालयात उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला, तर कुट्टन यांच्यावर तिरूअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू आहेत. 

राजेश यापूर्वी रेड एफएम या चॅनलवर आरजे म्हणून काम करायचे. सध्या ते केरळच्या दोहा येथील व्हॉईस ऑफ केरळ एफएम स्टेशनमध्ये आरजे म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी व एक मुलगा आहे. 

    

Web Title: Radio jockey murdered in Kerala, friend injured

टॅग्स