राफेलचा पहिल्यांदाच वायुसेना दिवस परेडमध्ये समावेश; जग्वार, सुखोईही दाखवणार दम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

वायुसेना दिवस 2020 च्या परेडमध्ये राफेल लढाऊ विमानही सहभागी होणार आहे. भारतात आल्यानंतर सार्वजनिकरित्या आपली ताकद दाखवण्याची राफेलची ही पहिलीच वेळ असेल.

नवी दिल्ली- वायुसेना दिवस 2020 च्या परेडमध्ये राफेल लढाऊ विमानही सहभागी होणार आहे. भारतात आल्यानंतर सार्वजनिकरित्या आपली ताकद दाखवण्याची राफेलची ही पहिलीच वेळ असेल. भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या मते, राफेलला दोन भागात विभागले आहे. 'विजय'मध्ये राफेलबरोबर जग्वारही उड्डाण करेल. त्यानंतर 'ट्रान्सफॉर्मर'मध्ये सहभागी होऊन राफेल आपली कमाल दाखवेल. त्यावेळी राफेलबरोबर सुखोई-30 एमकेआय आणि एलसीए तेजस लढाऊ एअरक्राफ्टचाही समावेश असेल. परेड दरम्यान हवाई प्रदर्शनावेळी 56 विमाने सहभागी होणार आहेत. 

हवाई प्रदर्शनात आकाश गंगा पथक, रुद्रा, चिनूकचाही समावेश असेल. स्टॅटिक प्रदर्शनात राफेलशिवाय चिनूक, मिग-29, अपाचे, मिराज, आकाश क्षेपणास्त्राची यंत्रणा पाहायला मिळेल. 'बहादूर' प्रकारात मिग-29 आणि सुखाई-30 आकाशात कसरती करताना दिसतील. 'एकलव्य' नावाचा नवा प्रकार तयार करण्यात आला असून यामध्ये लढाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश असेल. 

हे वाचा - बिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR

यावेळी हवाईदल प्रमुखांनी चीनबरोबर सुरु असलेल्या तणावावरही भाष्य केले. भारतीय लष्कर इतक्या वेगाने सीमावर्ती भागात हालचाल करु शकते की, शत्रूलाही त्याचा अंदाज येणार नाही. पूर्व लडाखमध्ये ज्या पद्धतीने आम्ही तैनात आहोत. त्यावरुन आमच्या ऑपरेशनल स्टेटचा अंदाज येईल. 

हवाई दलाच्या 17 व्या स्क्वाड्रनचा हिस्सा असलेल्या राफेलचे उड्डाण करणाऱ्या पथकात एका महिला वैमानिकाचाही समावेश आहे. हवाई दलाकडे सध्या 10 सक्रिय महिला वैमानिक आहेत. वायुसेना दिवसाच्या परेडवेळी सर्वांची नजर राफेलवर असेल. काही दिवसांपूर्वीच या विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafale Fighter Aircraft To Fly With Jaguars Su-30 Mki Lca Tejas During Air Force Day Parade