मोदीजी 'त्या' पीडितांना न्याय मिळेल, पण कधी?: राहुल गांधी 

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

अलीपूर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी कथुआ आणि उन्नावमधील घटनांविषयी प्रथमच भाष्य केले.

नवी दिल्ली : कथुआ व उन्नाव येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटना या सुसंस्कृत समाजाचा भाग असू शकत नाहीत. एक देश, एक समाज या दृष्टिकोनातून या घटना आपल्या सर्वांसाठी लाजिरवाण्या आहेत. यातील सर्व आरोपींना कठोर शासन केले जाईल, पीडित मुलींना पूर्णपणे न्याय मिळेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर काँंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींंना प्रश्न करत या पीडितांना न्याय कधी मिळणार हे जाणून घेऊ इच्छितो असे म्हटले आहे.

अलीपूर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी कथुआ आणि उन्नावमधील घटनांविषयी प्रथमच भाष्य केले. मोदी म्हणाले, "देशातील कोणत्याही राज्यात घडलेली बलात्काराची घटना आपल्या संवेदनांना ठेस पोचवते. अशा घटनांवर समाजानेही विचार करण्याची गरज आहे. आरोपीला शिक्षा देणे ही आमची जबाबदारी असून, मी देशातील नागरिकांना आश्वस्त करतो की, दोन्ही घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शासन केले जाईल. आपल्या मुलींना पूर्ण न्याय मिळेल.'' 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनांविषयी मौनात का आहेत, त्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी, असे आव्हान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले होते. भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर राहुल गांधी यांनी या पीडितांना न्याय कधी मिळणार असा मोदींना प्रश्न केला आहे.

Web Title: Rahul Gandhi asks question to Narendra Modi on Kathua Unnao rape case