दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावण्याची मोदींना सवय- राहुल

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मोदींची धोरणे विध्वंसक आहेत. रोजगार, सुरक्षा, नोटाबंदी अशा मुद्यांची ते उत्तर देऊ शकत नाहीत हे देशातील जनतेला माहीत आहे. त्यामुळे ते लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करतात.
- राहुल गांधी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष

राहुल गांधींचे टीकास्त्र, पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्याचा टोला

लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "गुगल सर्च' करण्याची आणि दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहण्याची सवय आहे. फावल्या वेळेत त्यांनी ते केल्यास आमची हरकत नाही. मात्र, पंतप्रधान म्हणून जी त्यांची जबाबदारी आहे, त्यात मोदी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदींना प्रत्युत्तर दिले.

लखनौतील संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाले की, "गुगल सर्च' करण्याची पंतप्रधानांना आवड आहे. दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहण्याचीही मोदींना सवय आहे. फावल्या वेळात त्यांनी तसे करत जावे. मात्र, पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळण्यात ते शंभर टक्के अपयशी ठरले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे पंतप्रधान मोदी यांना मोठा धक्का बसणार आहे, असे राहुल या वेळी म्हणाले. ""कॉंग्रेस पक्ष आणि नेत्यांची जन्मपत्रिका मोदींकडे आहे. मागील दोन वर्षांपासून ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदींनी खुशाल काय करायचे ते करावे,'' असे स्पष्ट करत राहुल यांनी मोदींना आव्हान दिले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीका करताना मोदींनी राज्यसभेत बोलताना वापरलेल्या शब्दांचा राहुल यांनी आज समाचार घेतला. "यूपीए'च्या काळात अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली, मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा उडाला नाही. त्यामुळे रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडून शिकून घ्यावी, असे मोदी म्हणाले होते.

Web Title: rahul gandhi attack on narendra modi