रोजगार दूरच, खायला अन्नही मिळणार नाही; कृषी कायद्यावरून राहुल गांधींचा घणाघात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे पंजाब राज्याला सर्वात मोठे नुकसान होईल आणि हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवरील हल्ला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. ट्विटरवर सातत्याने ते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतातच, मात्र आता त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईसाठी कंबर कसलेली असल्यांचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हाथरसच्या पीडितेला भेट देण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी झटापट केली. सरतेशेवटी ते पीडितेच्या कुंटुंबियांना भेटण्यात यशस्वी ठरले. आतादेखील राहुल गांधी सरकारने पारित केलेल्या तीन सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी म्हणून ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून रान उठवत आहेत. या पार्श्वभूमीवरच पंजाबमधील पटियाला येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप लावले आहेत. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे पंजाब राज्याला सर्वात मोठे नुकसान होईल आणि हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवरील हल्ला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा - 'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले की, हे जे कायदे पंतप्रधानांनी बनवले आहेत, ते शेतीचा आणि खाद्य सुरक्षेबाबत सध्याची संरचना नष्ट करण्यासाठीचा मार्ग आहे. हे शेतकऱ्यांवरचं आक्रमण आहे आणि या आक्रमणाला आम्ही थांबवू, या कायद्याविरोधात आम्ही लढू. मला असे वाटते की कृषी कायदे काय आहेत ते स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही समजलेले नाही. 
पुढे राहुल गांधी म्हणाले की, हा देश आपल्या तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. कारण मोदी सरकारने ढाचाच तोडला आहे. आता नरेंद्र मोदी शेती क्षेत्राचा ढाचा तोडायला निघालेत. जर शेती क्षेत्राचा ढाचा तोडला तर एका बाजूला रोजगार मिळणार नाहीच शिवाय दुसऱ्या बाजूला खायला अन्नही मिळणार नाही. 

हेही वाचा - सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

राहुल गांधी यांनी 4 ते 6 ऑक्टोबरदरम्यान सुधारित कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी म्हणून पंजाब-हरियाणा राज्यातून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या कायद्याविरोधात विरोधक एकवटले आहेतच, तसेच देशातील अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करत राहुल गांधी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी किसान की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशातील शेतकऱ्यांशी संवादही साधला होता.  

हाथरसप्रकरणी म्हणाले...
राहुल गांधी यांना हाथरसप्रकरणाबाबत विचारले असता म्हणाले की, मला थोडासा धक्का लागला ही काय फार मोठी गोष्ट आहे? इथे संपूर्ण देशालाच ढकललं जात आहे, मारलं जात आहे. हे असे सरकार  आहे जिथे आम्ही उभे राहिलो तर धक्का मारला जातो, लाठी चालवली जाते. ठिक आहे, आम्ही धक्का खाऊ, ती काही मोठी गोष्ट नाही. प्रशासनाने इतक्या चुकीच्या गोष्टी केलेल्या असतानाही पंतप्रधान मोदी एक शब्द बोलत नाहीत ही आश्चर्याची गोष्ट असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा - हाथरसप्रकरणी उत्तराखंड काँग्रेसचा सत्याग्रह; देशभरात योगी सरकारविरोधात निषेध आणि आंदोलनं

मोदी फक्त आपल्या प्रतिमेची काळजी करतात...
नरेंद्र मोदींनी म्हटलं की, भारताची जमीन कुणीही घेतली नाहीये. चीनने आपली 1200 चौरस किलीमीटर जमीन ताब्यात घेतली आहे. चीनला माहितीय की वर जो व्यक्ती बसला आहे तो तर फक्त आपल्या प्रतिमेची काळजी करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi attack on PM narendra Modi over farmers laws in tractor rally