'ओआरओपी'ची अंमलबजावणी करा - राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

आपल्या देशाचे जवान दररोज आपल्या प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत आहेत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे, की आपण त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतो.

नवी दिल्ली - दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील केंद्र सराकरने वन रँक वन पेन्शनची (ओआरओपी) योग्यरित्या अंमलबजावणी करून माजी सैनिकांना भेट दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माजी सैनिकांना दिवाळी भेट देण्याची मागणी केली आहे. ओआरओपीच्या मागणीसाठी माजी सैनिकांना आंदोलन केल्यानंतर केंद्राकडून ही योजना लागू करण्यात आली होती. पण, याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याने राहुल गांधी यांनी या विषयावर पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी लिहिले आहे, की आपल्या देशाचे जवान दररोज आपल्या प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत आहेत. त्यामुळे आपले कर्तव्य आहे, की आपण त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेतो. गेल्या काही दिवसांत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांकडे मी आपले लक्ष वेधतो. याचा परिणाम थेट जवानांच्या मानसिकतेवर होतो. अपंग जवानांच्या निवृत्तीवेतनात बदल, निमलष्करी जवानांना सातव्या वेतन आयोगापासून दूर ठेवणे अशा काही निर्णयांचा परिणाम होऊ शकतो. ओआरओपीसाठी निवृत्त जवानांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. त्यामुळे माझी पंतप्रधानांना विनंती आहे, की त्यांनी या समस्येतून मार्ग काढावा.

Web Title: Rahul Gandhi calls on Modi to implement OROP as Diwali gift to ex-servicemen