बहुमत चोरण्यासाठी भाजपने किती पैसे फेकले? : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायलयाने गोव्यात भाजप सरकार स्थापन करण्यासाठी शपथविधीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानंतर 'बहुमत चोरण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गोवा आणि मणिपूरमध्ये किती पैसे फेकले हा आमचा सवाल आहे' अशा तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली - सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करणे हा राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने गोव्यात भाजप सरकार स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानंतर 'बहुमत चोरण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गोवा आणि मणिपूरमध्ये किती पैसे फेकले हा आमचा सवाल आहे' अशा तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले, "एकूण पाच राज्यांपैकी भाजपने दोन राज्यात विजय मिळविलेला आहे. आम्ही तीन राज्यात विजय मिळविलेला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने जिंकलो आहोत. मात्र त्यांनी पैसा आणि सत्तेच्या बळावर लोकशाहीला सुरूंग लावला आहे. आमचा लढा भाजपच्या विचारसरणीविरूद्ध आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये त्यांनी जे काही केले आहे त्याच विचारसरणीविरूद्ध आमचा लढा आहे. सरकार स्थापनेचा दावा किती लवकर केला हा मुद्दा नाही; तर किती पैसे वापरून त्यांनी दावा केला, हा मुद्दा आहे.'

उत्तर प्रदेशमधील विजयाबाबत बोलताना ते म्हणाले, "आम्ही विरोधी पक्षात आहोत. चढ-उतार येत राहतात. आम्हाला उत्तर प्रदेशात थोडे अपयश मिळाले. तेथे भाजप विजयी ठरले. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आहेत. धुव्रीकरण हे त्यापैकी एक कारण आहे.'

Web Title: Rahul Gandhi comment on SC direction about Goa issue