राहुल गांधी...फसलेली (आणखी एक) मोहीम!

गौरव दिवेकर
शनिवार, 11 मार्च 2017

राहुल गांधी हे सध्या काँग्रेसचा चेहरा आहेत. देशपातळीवरील नेता म्हणून स्वत:ला प्रोजेक्‍ट करणं महत्त्वाचं असतं. लोकसभा निवडणुकीमध्ये थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून शड्डू ठोकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचाही प्रयत्न तोच होता. पण 'राष्ट्रीय नेता' म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केजरीवाल जितके प्रयत्न करताना दिसतात, तसे चित्र राहुल यांच्या बाबतीत दिसत नाही.

काँग्रेसचा आणखी एकदा पराभव झाला..राहुल गांधी पुन्हा हारले..नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' मोहिमेला आणखी बळ मिळाले..गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात झालेल्या कुठल्याही निवडणुकीनंतरची ही विश्‍लेषणाची ठरलेली वाक्‍यं! राहुल गांधी यांना 'देशाचा नेता' म्हणून प्रोजेक्‍ट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असूनही त्यांना आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत स्वत:चा प्रभाव सिद्ध करण्यात यश आलेलं नाही, हे सत्य कधीतरी पक्षाला स्वीकारावे लागणार आहेच; पण 'कधी' हा एक महत्त्वाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 

राहुल गांधी हे सध्या काँग्रेसचा चेहरा आहेत. देशपातळीवरील नेता म्हणून स्वत:ला प्रोजेक्‍ट करणं महत्त्वाचं असतं. लोकसभा निवडणुकीमध्ये थेट नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून शड्डू ठोकणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचाही प्रयत्न तोच होता. पण 'राष्ट्रीय नेता' म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केजरीवाल जितके प्रयत्न करताना दिसतात, तसे चित्र राहुल यांच्या बाबतीत दिसत नाही. चिंतेची बाब आहे, ती हीच! जबाबदारी स्वीकारणं हे नेत्याचं प्राथमिक लक्षण असतं. हेदेखील राहुल यांनी स्वीकारलं आहे, असं दिसत नाही. साधी गोष्ट घ्या..सध्याच्या ट्रेंडनुसार, बहुतांश राजकीय नेते ट्विटरवर सक्रिय असतात. पण राहुल गांधी इथेही स्वत:च्या नावानं नाही, 'ऑफिस ऑफ राहुल गांधी' म्हणून सक्रिय आहेत. आता 'देशातील किती टक्के जनता सोशल मीडियावर असते' किंवा 'सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष सामाजिक जीवनात फरक असतो' हे प्रतिवाद निव्वळ पुस्तकी झाले. कारण, गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियामध्ये आणि प्रत्यक्ष सामाजिक जीवनातही 'राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारली' हे चित्रच दिसत नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पुन्हा पुन्हा राहुल यांनाच प्रोजेक्‍ट करू पाहत आहेत..त्यामुळेच काँग्रेसच्या या पराभवांचे आता आश्‍चर्यही वाटेनासं झालं आहे. 

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांचे 'पंतप्रधानपदाचे उमेदवार' म्हणून अत्यंत आक्रमक मार्केटिंग केलं होतं. पण नुसतं मार्केटिंग आक्रमक असून चालत नाही. तुम्ही जो चेहरा विकू पाहत आहात, तोही आश्‍वासक असणे महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीतील दणदणीत पराभवामुळे काँग्रेस हा धडा शिकेल, असं त्यावेळी वाटलं होतं. पण 'पराभवाची सामूहिक जबाबदारी' या गोंडस आणि भंपक युक्तीवादाने कायमच राहुल यांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला गेला. 'निवडणुकीत उतरायचं, तर जिंकण्यासाठीच' हा ऍटिट्युड असणं कुठल्याही पक्षासाठी महत्त्वाचं असतंच. पण हाच 'किलर इन्स्टिंक्‍ट' काँग्रेसमध्ये दिसत नाही. पुन्हा पुन्हा राहुल यांच्या चेहऱ्यावर मतं मागण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. महाराष्ट्रात तेच झालं.. आता उत्तर प्रदेशातही तेच झालं..! पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत परतले, हा राहुल यांचा विजय अजिबात नाही. कॅप्टन अमरिंदरसिंगसारख्या खमक्‍या नेत्यानं पंजाबमध्ये संपूर्ण निवडणूक स्वत:च्या खांद्यावर घेतली होती आणि त्याचे निकालही सर्वांसमोर आहेत. 

मोदी आणि भाजप यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'च्या कितीही घोषणा केल्या, तरीही आपल्या देशामध्ये काँग्रेसची पाळंमुळं खूप खोलवर आहेत. देशात स्थिर सरकार जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच विरोधी पक्षही महत्त्वाचा आहेच. पण विरोधी पक्ष सक्षम असावा, यासाठी प्रयत्न काँग्रेसने करायचे आहेत, मतदारांनी नाही. एखादं उत्पादन खपलं नाही, तर कंपनी मार्केटिंगची पद्धत बदलते.. तरीही खप नसेल, तर उत्पादनातच बदल केला जातो. बहुदा काँग्रेसला ही पद्धत अंशत:च मान्य असावी. कारण लोकसभेतल्या झडझडीत मारानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी प्रशांत किशोर यांची नियुक्ती केली. पण नुसतं मार्केटिंग बदलून चालत नाही, हे काँग्रेसला पटत नाही. म्हणूनच, राहुल गांधी यांना न चालणारा चेहरा घेऊन मार्केटिंग बदलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सपशेल फसला आहे. 

राहुल गांधी राष्ट्रीय नेते म्हणून किंवा 'पंतप्रधानपदाचा चेहरा' म्हणून अपयशी ठरले, यावर उत्तर प्रदेशच्या निकालांनी शिक्कामोर्तब केलं आहे. हे काँग्रेसला कळत आहेच.. प्रश्‍न आहे बदलणार कधी, हा! पण 'राहुल गांधी पद सोडणार नाहीत; नेहरु-गांधी घराण्यामुळेच काँग्रेस एकसंध आहे,' अशी वक्तव्यं करत दिग्विजयसिंहसारख्यांनी पुन्हा याकडे काणाडोळा करण्याचा खेळ सुरू केला आहे. याच खेळात अडकणं, ही काँग्रेसची अडचण आहे.. राहुल गांधी यांना तरी ते लवकर कळावं, हीच अपेक्षा!

Web Title: Rahul Gandhi Congress Prashant Kishor UP Election Punjab election Narendra Modi BJP Gaurav Divekar