गुजरातेत पडणार आश्वासनांचा पाऊस: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

आजचा हवामानाचा अंदाज आहे, निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये आज आश्वासनांचा पाऊस पडणार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून, आज (सोमवार) गुजरातमध्ये आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याची उपरोधिक टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आज पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते गांधीनगर येथे भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच या दौऱ्यादरम्यान ते अनेक घोषणा करण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसनेच यापूर्वीच मोदींच्या गुजरात दौऱ्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम मागे ठेवल्याचा आरोप केला होता. आता राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून भाजप व नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे, की आजचा हवामानाचा अंदाज आहे, निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये आज आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींना लक्ष्य केले आहे. सुरजेवाला म्हणाले, की गुजरातमधील साडेसहा कोटी जनतेला विनंती आहे, त्यांनी आज छत्री घेऊन घराबाहेर पडावे. कारण, आश्वासने देणारा राजा गुजरातमध्ये येत आहे. त्यामुळे कोठेही आश्वासनांचा पाऊस पडू शकतो.

Web Title: Rahul Gandhi criticize Narendra Modi on Gujrat tour