'अपयशी नेता' म्हणून 'गिनेस बुक' यावे राहुल गांधींचे नाव!

पीटीआय
सोमवार, 20 मार्च 2017

विशालने केलेल्या दाव्यानुसार, राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मागील पाच वर्षांत देशभरात 27 निवडणुका हरल्या आहेत. या अपयशामध्ये कमालीचे सातत्य असून त्यामुळे या गोष्टीची नोंद होणे आवश्‍यक असल्याचे विशालचे म्हणणे आहे.

होशंगाबाद (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सामोरे जावे लागलेल्या पराभवाची संख्या प्रचंड असल्याने या 'कामगिरी'बद्दल राहुल यांचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवावे, अशी मागणी येथील एका युवकाने केली आहे. त्याने अत्यंत गांभीर्याने ही मागणी केली असून, यासाठी 'गिनेस बुक'कडे शुल्क भरून रितसर अर्जही केला आहे. 

विशाल धवन असे या युवकाचे नाव असून, तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. भाजपवरील आरोप, जाहीर भाषणांमधील टोमणे, सोशल मीडियावरील विनोद; तर कधी दीर्घ सुटी यामुळे राहुल गांधी हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, विशालने केलेली ही मागणी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याच्या 'नशिबात' आली नसल्याची चर्चा होत आहे.

विशालने केलेल्या दाव्यानुसार, राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मागील पाच वर्षांत देशभरात 27 निवडणुका हरल्या आहेत. या अपयशामध्ये कमालीचे सातत्य असून त्यामुळे या गोष्टीची नोंद होणे आवश्‍यक असल्याचे विशालचे म्हणणे आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, विशालने 'गिनेस बुक'कडे रितसर अर्ज केला असून हा अर्ज मिळाल्याची पोचपावतीही त्याला प्राप्त झाली आहे. अर्थात, अशा प्रकारच्या अर्जाचा विचार करायचा की नाही, याबाबतचा निर्णय 'गिनेस बुक' घेणार आहे.

Web Title: Rahul Gandhi UP election Congress Guinness Book of World records