esakal | नोटाबंदी हा बड्या उद्योगांची कर्जे माफ करण्याचा डाव; राहुल गांधी यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

कॅशलेस इंडिया, कॅशलेस हिंदुस्तानचे स्वप्न त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात रोजच्या रोज रोकड पैशावर चालणाऱ्या असंघटित क्षेत्राला नष्ट करण्याचे हे षड्‌यंत्र होते असं राहुल गांधी म्हणाले.

नोटाबंदी हा बड्या उद्योगांची कर्जे माफ करण्याचा डाव; राहुल गांधी यांची टीका

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता.३ : नोटाबंदी हा गरीब आणि असंघटित क्षेत्रावरचा हल्ला होता आणि हे क्षेत्र नष्ट करण्याचा हेतु त्यामागे होता. तसेच बड्या उद्योगांची कर्जे माफ करण्याचाही त्यामागे डाव होता, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावला असून याविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी आज केले. भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक मुद्यांवर जनतेबरोबर संवाद साधण्याच्या मालिकेत त्यांनी नोटाबंदीवर भाष्य केले.

पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री नोटाबंदी जाहीर करुन पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याची आठवण देऊन, राहुल गांधी म्हणाले, की यानंतर नोटा बदलण्यासाठी सारा देश बॅंकांसमोर रांगेत उभा राहिला. ही घोषणा करताना पंतप्रधानांनी काळा पैसा नष्ट होण्याचा दावा केला होता. खरोखर यानंतर काळा पैसा नष्ट झाला काय या प्रश्‍नाचे उत्तर"नाही' असे आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाचा फायदा कुणाला झाला ? याचा फायदा देशातल्या अब्जाधीशांना झाला. कारण सामान्य माणसाने ज्या अपेक्षेने पैसे बॅंकामध्ये भरले त्याचा उपयोग बड्या उद्योगांची कर्जे चुकविण्यासाठी किंवा माफ करण्यासाठी केला गेला असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

हे वाचा - यूकेचे पंतप्रधान करु शकतात मग माेदी का नाही? पृथ्वीराज चव्हाण

या निर्णयाचा आणखी एक गोपनीय हेतु होता असा आणखी एक सनसनाटी आरोप लावून ते म्हणाले, की भारतातील असंघटित क्षेत्र प्रामुख्याने रोख पैशावर चालते. लहान दुकानदार, शेतकरी, कष्टकरी हे सर्वच रोजंदारीवर काम करुन रोख पैशाच्या आधारे काम करीत असतात. या असंघटित क्षेत्राचे अस्तित्वच नष्ट करण्याचा या निर्णयामागील गुप्त हेतु होता. पंतप्रधानांनी स्वतःच कॅशलेस म्हणजे रोकड-विरहित उलाढाली व व्यवहार करण्यास प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते.

रोखीचे व्यवहार करणारे भरडले
कॅशलेस इंडिया, कॅशलेस हिंदुस्तानचे स्वप्न त्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात रोजच्या रोज रोकड पैशावर चालणाऱ्या असंघटित क्षेत्राला नष्ट करण्याचे हे षड्‌यंत्र होते. या प्रक्रियेत कोण भरडले गेले असा सवाल करुन त्यांनी शेतकरी, कष्टकरी, लहान दुकानदार, लघु व मध्यम उद्योजक जे रोखीच्या व्यवहारावर अवलंबुन होते आणि ते सर्व या निर्णयात भरडले गेले. हा एक प्रकारे या वर्गावरच हल्ला होता. या हल्ल्याचे परिणाम दिसत आहेत आणि त्याविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे आणि सर्वांनी एकत्रितपणे तो देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे, असे म्हटले.

loading image