Rahul Gandhi
Rahul Gandhi

महात्मा गांधींच्या भूमीत उभा राहतोय 'युवा गांधी' 

राजकोट (गुजरात) : राष्ट्रीय राजकारणात "पप्पू' म्हणून हेटाळणी झालेले राहुल गांधी गुजरात निवडणुकीच्या माध्यमातून सभ्यता व सहजपणाची नवी ओळख घेऊन उभे राहत असल्याचे चित्र कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्यासाठी सुखावह ठरत असून "गांधी के गुजरात मे युवा गांधी खडा हो रहा है' अशी सहज भावना ग्रामीण गुजरातमधील तरूण बोलून दाखवत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होमग्राऊंडवर यावेळेस लढाई जिंकणे फारच अशक्‍य असल्याची भावना स्थानिक कॉंग्रेस नेत्यांमध्ये होती; पण राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये तळ ठोकत प्रचाराची धुरा अंगावर घेतल्याने या नेत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही निवडणूक केवळ लढायची अशा पराभूत मानसिकतेत आम्ही नेते होतो. त्यामुळे चार महिन्यापूर्वी इथे कॉंग्रेसची फार तयारी देखील सुरू झालेली नव्हती अशी कबुली सौराष्ट्राची जबाबदारी असलेले खासदार राजीव सातव यांनी दिली. पण नोटाबंदीचा असंतोष असलेल्या गुजरातमध्ये "जीएसटी'मुळे उद्रेक झाला. जनतेची भावना व भाजपविरोधी लाट निर्माण होत असल्याचे लक्षात येताच राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये आक्रमकपणे लढण्याचा निर्णय घेतला. यासाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठीची जबाबदारी देशभरातील अत्यंत विश्वासू कॉंग्रेस नेत्यांकडे देण्यात आली. 

देवीचे दर्शन 
स्वत: राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये मागील 21 दिवसांपासून तळ ठोकला आहे. कोणताही बडेजाव न करता आहे त्या परिस्थितीत त्यांनी मुक्काम करणे पसंत केले. ते जिथे राहतात त्या शहरात अथवा हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारची विशेष सुरक्षा वा सुविधा आहे किंवा नाही हे पाहिले जात नाही. राजकोट शेजारीच चोटीला गावात 1100 पायऱ्या चढून गेल्यावर उंच डोंगरावर देवीचं मंदिर आहे. या गावात सभेसाठी राहूल गांधी आल्यानंतर त्यांनी या चामुंडा देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सर्व नेत्यांनी विरोध केल्यानंतरही ते निघाले व कुठेही न थकता न थांबता 1100 पायऱ्या चढत जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. 

साध्या लॉजवर मुक्काम 
राजकोटमध्ये असताना राहुल गांधी एका साध्या लॉजवर राहिले होते. अचानक ते राहणार असल्याचे कळल्यावर लॉज मालकाने "एसपीजी'च्या दबावाने लॉजमध्ये एक चांगली रूम होती त्यामध्ये असलेल्या लग्नाच्या नव्या जोडप्याला रूम बदलण्याचा आग्रह केला. पण राहुल गांधी यांनी स्वत: एकाही रूममधून कोणत्याही ग्राहकाला काढू नका, असे सांगत जी रिकामी आहे ती रूम घेतली. या रूममध्ये साधा नगरसेवक देखील राहिला नसता अशी चर्चा राजकोटमधील सामान्य नागरिकांत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com