राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन?; शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षपदी

गुरुवार, 30 मे 2019

'राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून या एकत्रित पक्षाचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावे', असे राजकीय समीकरण गेले काही दिवस पुढे येत आहे. राहुल यांच्या भेटीमुळे याच समीकरणास बळ मिळाले आहे.

नवी दिल्ली : सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आता आमूलाग्र बदलांसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक भेट घेतली. विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. अजूनही राहुल याच निर्णयावर ठाम आहेत.

राजीनाम्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विनवणीसाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. पण राहुल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका गांधी वगळता एकाही काँग्रेस नेत्याला भेट दिलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पवार यांची अचानक भेट घेतली. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचीही भेट घेणार आहेत. स्वपक्षातील नेत्यांना भेटी नाकारत पवार यांची भेट घेण्यामागे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा असल्याचेही सांगितले जात आहे. अर्थात, या सर्व चर्चा सध्या प्राथमिक माहितीवर आधारित आहेत. दोन्ही पक्षांमधील कोणत्याही अधिकृत सूत्रांनी या माहितीस अद्याप दुजोरा दिलेला नाही.

'राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून या एकत्रित पक्षाचे नेतृत्त्व शरद पवार यांनी करावे', असे राजकीय समीकरण गेले काही दिवस पुढे येत आहे. राहुल यांच्या भेटीमुळे याच समीकरणास बळ मिळाले आहे. 'पवार यांचे मार्गदर्शन कायमच घेत असतो', असे राहुल यांनी यापूर्वीही सांगितले होते. त्यामुळे ही भेट निव्वळ मार्गदर्शनासाठी आहे की त्यातून नवी राजकीय गणिते समोर येणार, याकडे राजकीय विश्‍लेषकांचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi meets Sharad Pawar with speculations of NCP and Congress merging