खासदार राहुल गांधींना शोधा आणि बक्षीस मिळवा

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मागील सहा महिन्यांपासून राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघात गेलेले नाहीत. त्यामुळे गांधी यांच्याबद्दल येथील लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे हरविले (मिसिंग) आहेत असे फलक अमेठीमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधकांनी लावले आहेत. 

राहुल गांधी यांचे छायाचित्र आणि त्याखाली 'आमच्या खासदारांना शोधून काढणाऱ्यास बक्षीस देण्यात येईल' असे लिहिलेले आहे. असा आशय असणारी अनेक पोस्टर अमेठी मतदारसंघात लावण्यात आली आहेत. मात्र, ही पोस्टर्स नेमकी कोणी लावली आहेत त्या व्यक्ती वा संघटनांचा उल्लेख त्यावर करण्यात आलेला नाही. 

मागील सहा महिन्यांपासून राहुल गांधी त्यांच्या मतदारसंघात गेलेले नाहीत. त्यामुळे गांधी यांच्याबद्दल येथील लोक नाराजी व्यक्त करत आहेत. राहुल यांनी येथील मतदारांचा अपमान केला आहे असेही पोस्टर्सवर म्हटले आहे. 

दरम्यान, भाजप आणि इतर राजकीय विरोधकांनी ही पोस्टरबाजी केली आहे. प्रामुख्याने गोवरीगंज भागात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये येथील मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिल्याने अमेठी मतदारसंघात राहुल यांना रुची राहिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीमुळे खासदार स्थानिक परिसर विकास निधीतून होणाऱ्या कामांचा वेग मंदावला असल्याचा आरोपही या पोस्टरवरून करण्यात आला आहे.  राहुल गांधी यांनी लवकरात लवकर मतदारसंघाला भेट द्यावी अशी मागणी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या पोस्टरबाजीनंतर पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
 

Web Title: rahul gandhi is missing describe posters in amethi