
Rahul Gandhi : काँग्रेस पक्ष मध्यप्रदेश, छत्तीसगडसह राजस्थानमध्ये विजयासमीप; राहुल गांधींचा दावा
नवी दिल्ली - या वर्षाच्या शेवटी चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. राहुल यांनी काँग्रेस पक्ष आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत तेलंगना, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय मिळवणार असल्याचं म्हटलं.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा करताना राहुल गांधी म्हणाले की भाजप देखील हैराण होईल. आम्ही कर्नाटकात अनेक गोष्टी शिकलो. आता त्याचपद्धतीनेच आम्ही पुढं जाणार आहोत. आम्ही निश्चितच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकणार आहे. तर राजस्थानमध्ये देखील विजयाच्या समीप आहे.
दरम्यान भाजपला देखील सर्व ठावूक आहे. भाजपमध्ये देखील काँग्रेस जिंकणार अशा चर्चा सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, भाजप निवडणुका जिंकण्यासाठी लक्ष वितलीत करत असते. प्रतिस्पर्ध्यांना आपले म्हणणे मांडू देत नाही. हा धडा काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीतून घेतला आहे. त्यामुळेच भाजपला लक्ष भरकटवण्यात यश आलं नाही.
राहुल गांधी यांनी बिधुरी आणि निशिकांत दुबे यांच्या विधानांना भाजपकडून लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, जेव्हा काँग्रेस नेते सभागृहात कोणताही मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप अशाच गोष्टींचा वापर करते. पण आता आम्ही भाजपला सामोरे जायला शिकलो असल्याचही राहुल गांधी यांनी नमूद केलं.