PM Modi : मोदी कधीही ओबीसींसोबत हस्तांदोलन करत नाहीत पण अब्जाधीश उद्योगपतींना मात्र... राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कुटुंबात झालेला नाही, ते स्वतःची ‘ओबीसी’ अशी ओळख सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत,’’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली.
rahul gandhi pm narendra modi not obc general category odisha
rahul gandhi pm narendra modi not obc general category odishaSakal

झारसुगुडा (ओडिशा) : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कुटुंबात झालेला नाही, ते स्वतःची ‘ओबीसी’ अशी ओळख सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत,’’ अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. राहुल यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा ओडिशातील टप्पा आज संपला.

याप्रसंगी आयोजित छोटेखानी सभेत बोलताना राहुल यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला. मोदींचा जन्म हा सामान्य जातीमध्ये झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल म्हणाले, ‘‘ स्वतःची ओबीसी अशी ओळख सांगून पंतप्रधान मोदी हे लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांचा जन्म हा घंची जातीमध्ये झाला असून या जात समूहाला गुजरातमध्ये २००० साली भाजपची सत्ता आल्यानंतर ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदी यांनी स्वतःची जात ‘ओबीसी’ करून घेतली त्यामुळे ते काही जन्माने ओबीसी ठरत नाहीत.’’ ‘‘पंतप्रधान मोदी हे या देशामध्ये कधीच जातीनिहाय जनगणना घेणार नाहीत आणि त्याच्याशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही. अनेकांना सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जात आहेत. केवळ काँग्रेस पक्षच जातीनिहाय जनगणना करू शकतो,’’ असेही त्यांनी नमूद केले.

ते काही गरीब नाहीत

‘‘देशामध्ये जेव्हा सामाजिक न्याय आणि जातीनिहाय जनगणनेची चर्चा होते तेव्हा मोदी हे मोठ्या हुशारीने या देशात केवळ गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती असल्याचे सांगून वेळ मारून नेतात. पंतप्रधान म्हणतात हे जर खरे असेल तर ते कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व करतात. ते स्वतः हे काही गरीब नाहीत.

दिवसभरात अनेक वेळा ते स्वतःचे कपडे बदलतात आणि त्यानंतर स्वतः ओबीसी असल्याचे सांगतात. ते कधीही ओबीसींसोबत हस्तांदोलन करत नाहीत पण अब्जाधीश उद्योगपतींना मात्र मिठ्या मारतात,’’ असेही राहुल यांनी स्पष्ट केले. ओडिशातील दोनशे किलोमीटरपर्यंतचा टप्पा पार केल्यानंतर राहुल यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने आज शेजारील राज्य छत्तीसगडमध्ये प्रवेश केला.

सरकार म्हणते, राहुल खोटारडे

राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल एक ब्रिफ नोट प्रसिद्ध केली आहे. ‘मोध घंची ही जात (आणि पंतप्रधान मोदी ज्या उप-समुहाचे प्रतिनिधित्व करतात तो समूह) यांचा गुजरात सरकारने तयार केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि ओबीसींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

गुजरातमधील सर्वेक्षणानंतर मंडल आयोगाने निर्देशांक ९१ (अ) अंतर्गत ओबीसी जात समुहांची एक यादी तयार केली होती. त्यात ‘मोध घंची’ या जातीचाही समावेश आहे. केंद्र सरकारने गुजरातसाठी १०५ ओबीसी जातींचा समावेश असलेली एक यादी तयार केली असून त्यामध्ये देखील मोध घंची या जातीचा समावेश आहे.

केंद्र सरकारने ४ एप्रिल २००० रोजी काढलेल्या अधिसूचनेला अनुसरूनच संबंधित उप-समूहाचा ओबीसींच्या यादीत समावेश करण्यात आला होता. जेव्हा याबाबतच्या दोन्ही अधिसूचना निघाल्या तेव्हा मोदी हे सत्तेत नव्हते तसेच त्यांच्याकडे कसलेही अधिकार नव्हते,’ असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

भाजपकडे दोन कलमीच कार्यक्रम असून त्यामध्ये अन्यायाला प्रोत्साहन देणे आणि द्वेष तसेच हिंसाचाराचा प्रसार करणे यांचा समावेश आहे.

- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते (छत्तीसगडमधील सभेतून)

राहुल गांधी हे धादांत खोटे बोलत असून पंतप्रधान मोदी यांच्या जातीचा २७ ऑक्टोबर १९९९ रोजीच इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यात आला असून हे सगळे ते गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या दोन वर्षे आधीच घडले. सगळे नेहरू-गांधी कुटुंबीय हे ‘ओबीसीं’च्या विरोधात आहेत.

- अमित मालवीय, भाजपच्या ‘आयटीसेल’चे प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com