"मोदींच्या 'असत्याग्रहा'चा इतिहास मोठा; शेतकरी आता करणार नाहीत भरोसा"

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकवेळी दिलेली आश्वासने आणि त्यांचं पुढे काय झालं, याची आठवण करुन दिलीय.

नवी दिल्ली : सरकार आणि शेतकऱ्यांच्या दरम्यान आज बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या काही वेळापूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकवेळी दिलेली आश्वासने आणि त्यांचं पुढे काय झालं, याची आठवण करुन दिलीय. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'असत्याग्रहा'च्या मोठ्या इतिहासामुळे शेतकऱ्यांचा आता त्यांच्यावर विश्वास उरला नाहीये. 

त्यांच्या ट्विटचा आशय आहे की, प्रत्येकवेळी पंतप्रधान मोदी देशवासीयांना आश्वासन देऊन भुलवतात आणि नंतर त्याप्रमाणे काहीच घडत नाही. त्यांच्या या सातत्यपूर्ण कृतीला राहुल गांधींनी 'असत्याग्रह' असे म्हटलं आहे. 
त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख आणि दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होते, असं वचन त्यांनी देशवासीयांना दिलं होतं. त्याचं काय झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीनंतर म्हटलं होतं की मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या, मी सारं काही ठिक करतो. 

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सिंघू बॉर्डरवर वरात; नवरदेव म्हणाला, कायदे रद्द करण्याची सरकारने द्यावी भेट

पुढे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोनाच्या परिस्थितीबाबतही टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की आपण कोरोनाविरोधातील लढाई केवळ 21 दिवसांत जिंकू मात्र, काय झालं ते आपल्याला माहितच आहे. मोदींनी म्हटलं होतं की भारताच्या भागात कुणाचीही घुसखोरी झाली नाहीये आणि होणारही नाही. मात्र, वास्तव सगळ्यांना माहित आहे. मोदींच्या खोटं बोलण्याचा इतिहास मोठा असल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi said pm modi has long history of asatyagrah farmers doesnt believe him