'यूपी' सोडा; बिहारमधील 'एक्‍झिट पोल' आठवतायत ना? : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

आमची आघाडीच जिंकणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्येही अशाच स्वरूपाचे 'एक्‍झिट पोल' होते. आता आपण याविषयी उद्याच बोलू.

नवी दिल्ली : 'उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार' असे अंदाज वर्तविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खिल्ली उडविली. 'अशा पद्धतीचे अंदाज बिहारमधील निवडणुकीतही वर्तविले होते. त्यामुळे आपण उद्याच बोलू,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली. 

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील शेवटच्या टप्प्याचे मतदान काल (गुरुवार) झाले. त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी 'एक्‍झिट पोल' जाहीर केला. यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. पंजाबमध्ये मात्र सत्ताधारी भाजप-अकाली दलाचा पराभव दिसत असून कॉंग्रेस आणि 'आप'मध्ये चुरस असेल, असेही या सर्वेक्षणांत म्हटले आहे. याशिवाय, उत्तराखंड आणि गोव्यात भाजप सत्तेत येईल आणि मणिपूरमधील निकालांबाबत विविध सर्वेक्षणांमधून वेगवेगळी चित्रे समोर आली. 

उत्तर प्रदेशमध्ये यंदा कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने आघाडी केली आहे. या राज्यात भाजप, कॉंग्रेस-सप, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष यांच्यात लढत आहे. 'एक्‍झिट पोल'विषयी प्रतिक्रिया विचारली असता राहुल म्हणाले, "आमची आघाडीच जिंकणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्येही अशाच स्वरूपाचे 'एक्‍झिट पोल' होते. आता आपण याविषयी उद्याच बोलू.'' दोन वर्षांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत विविध वृत्तवाहिन्यांच्या 'एक्‍झिट पोल'मध्ये भाजपच्या विजयाचे अंदाज वर्तविण्यात आले होते. प्रत्यक्षात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसच्या महाआघाडीला विजय मिळाला होता आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. 

विविध संस्थांच्या सहा 'एक्‍झिट पोल'च्या सरासरीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 211 जागा मिळतील. येथे बहुमतासाठी किमान 202 जागांची गरज आहे. 

Web Title: Rahul Gandhi Says 'Remember Bihar?' on UP exit polls