देशातील या परिस्थितीला उत्तम मानायचं का? राहुल गांधींचा मोदी सरकारला चिमटा

सुशांत जाधव
सोमवार, 13 जुलै 2020

देशात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाजन्य संकट आवाक्यात असल्याचा मोदी सरकारचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय. कोरोनामुळे देशात निर्माण झालेली बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन एक ग्राफ शेअर करत भारतातील सद्यपरिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारतातील परिस्थिती चांगली आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. यावर राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलय.  भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमधील कोरोनाची परिस्थिती काय आहे? यासंदर्भातील माहिती त्यांनी ग्राफच्या माध्यमातून शेअर केली आहे. देशात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वीही राहुल गांधी यांनी ग्राफच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले होते. 

COVID-19 पार्टी जीवावर बेतली; चूक कळली पण...

ग्राफचा फोटो ट्विट करताना राहुल गांधींनी  'कोविड-19 विरोधातील लढ्यात भारत सुस्थितीत? असा प्रश्न उपस्थितीत करुन मोदी सरकारचा दावा फोल असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. साप्ताहिक आकडेवारीच्या आधारावर राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या ग्राफमध्ये दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड कोरोना लढा जिंकण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसते. तर भारत आणि अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळते. भारताच्या तुलनेत अमेरिकेतील परिस्थितीमध्ये अधिक सुधारणा होत असल्याचे ग्राफमध्ये दिसून येते. 

अखेर ट्रम्प यांच्या तोंडाला मास्क; रुग्णालयात जाण्यापूर्वी घेतली खबरदारी

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोविड 19 च्या लढ्याविरोधात भारत विजयी पथावर असल्याचा दावा करण्यात आला होता. कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरणाऱ्या भारतावर जगभरातून कौतुक होत आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी भारत एक आहे. भारत कोरोनाचा सामना कसा करणार? हा प्रश्न जगातील अनेक राष्ट्रांनाही पडला होता. पण भारताने करुन दाखवले, अशा आशयाचे विधान अमित शहा यांनी केले होते. कोरोनाच्या विरोधात भारत प्रभावीपणे सामना करत आहे, असेही ते म्हणाले होते. मात्र राहुल गांधी यांच्या ट्विटमधील आकडेवारी केंद्र सरकारचा दावा फोल असल्याचे सांगते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi slams modi government over covid 19 questions claim of good position