मोदींच्या अहंकारामुळे जवान शेतकऱ्यांविरोधात उभा राहिले, राहुल गांधींचा हल्लाबोल

वृत्तसंस्था
Saturday, 28 November 2020

भाजप सरकारच्या काळात देशाची व्यवस्था पाहा, जेव्हा भाजपचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले जाते. परंतु, शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जात असलेल्या शेतकऱ्यांवर बलप्रयोग करणाऱ्या मोदी सरकारचा त्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे जवानांना शेतकऱ्यांविरोधात उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही मोदी सरकारवर टीका केली. दिल्लीत येणाऱ्या अब्जाधीशांनना रेड कार्पेट अंथरले जाते आणि शेतकरी रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्यावर बलप्रयोग केले जाते, असे त्यांनी म्हटले. 

राहुल गांधी यांनी एक सुरक्षा कर्मचारी शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा फोटो शेअर करत टि्वट केले की, 'हा अत्यंत वेदनादायी फोटो आहे. आमची घोषणा ही ‘जय जवान जय किसान' अशी होती. परंतु, आज पंतप्रधान मोदी यांच्या अहंकारामुळे जवानांना शेतकऱ्यांविरोधात उभे केले आहे. हे खूप धोकादायक आहे.' 

हेही वाचा- देशात आता फक्त BIS Certified हेल्मेट; मोदी सरकारचा नवा आदेश

प्रियांका गांधी यांनीही याप्रकरणी टि्वट केले. त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात देशाची व्यवस्था पाहा, जेव्हा भाजपचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले जाते. परंतु, शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. दिल्लीने शेतकऱ्यांविरोदात कायदा बनवणे योग्य आहे. पण सरकारला आपले म्हणणे सांगण्यासाठी तेच शेतकरी दिल्लीत आले तर चुकीचे का ?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

हेही वाचा- PM मोदींच्या दौऱ्यासाठी Air India-1 ही विशेष विमाने; सुरक्षेसाठी आहेत 'या' तरतुदी

उल्लेखनीय म्हणजे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत कुच करत असलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत दाखल होण्याची परवानगी देण्यात आली. हे शेतकरी आता बुराडी मैदानात आंदोलन करु शकतात. यापूर्वी हरियाणामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा आणि अश्रू धुराचा वापर केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi tweets on pm narendra modi shares photo of cop beating farmer attack