Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधीच राहणार अध्यक्षपदी, मात्र 'या' अटीवर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुनामीमुळे झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असताना आज (मंगळवार) अखेर त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आहे. पण, त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी अट ठेवली असून, ती पक्षाकडून मान्य करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारिणीने फेटाळला असला, तरी राहुल यांनी मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पर्याय शोधण्यास सांगितल्याचे कळत होते. काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या असून, वरिष्ठ नेत्यांविरुद्धचा असंतोष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारांचे भवितव्यही दोलायमान स्थितीत सापडले आहे. अशातच राहुल यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर आणखी अवस्था वाईट होईल, अशी स्थिती होती. त्यामुळे पक्ष आणि संघटनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार स्वतःकडे ठेवण्याची अट घालत त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

काँग्रेसने प्रसारमाध्यमांना 'अफवा पसरवू नका,' असे आवाहन केले आहे. आज (मंगळवार) सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांची भेट घेऊन राहुल यांचे मन वळविले. यापूर्वी राहुल यांनी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी रद्द करत, खजिनदार अहमद पटेल, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना अध्यक्षपदासाठी पर्याय शोधण्यासाठीही सूचना दिल्याचे बोलले जात होते. यामुळे माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लढविले जात असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली होती.

लोकसभा निवडणुकीत सपाटून झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी शनिवारी (ता. 25) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल यांनी काँग्रेसशासित राज्यांमध्ये झालेला पराभवावर "कमलनाथ, अशोक गेहलोत, पी. चिदंबरम यांसारख्या नेत्यांचा पुत्रमोह पक्षाला भोवला,' अशा शब्दात संताप व्यक्त केला. तसेच, "बिगरगांधी अध्यक्ष निवडा,' असेही बजावले होते. यानंतर कार्यकारिणीने राजीनामा नाकारताना पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे अधिकारही राहुल गांधींकडे सोपविणारा एकमुखी ठरावही संमत करण्यात आला आहे. 

- मोदी सुनामीनंतर... 
- पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे अजय कुमार व आसामचे रिपून बोरा यांचे राजीनामे. 
- काँग्रेसच्या नेतृत्वात या स्थितीत बदल करणे मूर्खपणाचे ठरेल ; सलमान खुर्शिद 
- काँग्रेसच्या राजस्थान, मध्य प्रदेश सरकारांचे भवितव्य दोलायमान. 
- राजस्थानातील गेहलोत सरकारला पाठिंबा कायम ः बसपचा खुलासा 
- कर्नाटकात एच. डी. देवेगौडा यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याबरोबर चर्चा. 
- राजस्थानात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या झाडाझडतीची उदय लाल अंजाना आणि रमेश मीणा या दोन मंत्र्यांची मागणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com