भविष्यात ठाकरे- शिंदे मनोमिलन शक्य? राहुल शेवाळेंचे सूचक वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Shewale statement Thackeray-Shinde rapprochement possible in future
भविष्यात ठाकरे- शिंदे मनोमिलन शक्य? राहुल शेवाळेंचे सूचक वक्तव्य

भविष्यात ठाकरे- शिंदे मनोमिलन शक्य? राहुल शेवाळेंचे सूचक वक्तव्य

‘‘ शिवसेना खासदारांनी भाजपशी पुन्हा युतीसाठी आग्रह धरल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून अनिल देसाईंनी पंतप्रधान मोदींशी तर अरविंद सावंत यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांशी संपर्काचे प्रयत्न सुरू केले होते,’’ असा नवा गौप्यस्फोट शिवसेनेचे लोकसभेतील नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला. ‘लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे चेहरा होऊ शकत नाही,’ अशी स्पष्टोक्ती बोलून दाखविणाऱ्या शेवाळे यांनी पक्षाचा कारभार उद्धव ठाकरेंनी तर राज्य एकनाथ शिंदे यांनी चालवावे यावर भविष्यात सकारात्मक काहीतरी होईल, असा आशावाद व्यक्त केला.

प्रश्न : भाजपशी युतीसाठी आग्रह का होता?

शेवाळे : आमदारांच्या नाराजीनंतर उद्धव ठाकरेंकडे झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाच्या चेहऱ्यावर मते मिळतील हा विषय आला होता. त्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे चेहरा असतील असे सांगितले. मात्र, हा चेहरा राज्यापुरता असून लोकसभा निवडणुकीत ‘यूपीए’चा चेहरा राहुल गांधींच्या नावावर मते मागावी लागतील. उद्धव ठाकरेंसाठी ‘यूपीए’ त्यांच्या निर्णयात बदल करणार नाही आणि आपले मतदारही त्यांना मतदान करणार नाहीत. त्यात निवडणूक चिन्हाबद्दलची आणि मित्रपक्षांबद्दलची अनिश्चितता पाहता २०१९ च्या कौलाप्रमाणेच जावे, ही आमची मागणी होती.

- बोलणी कोठे फिसकटली?

उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान मोदींच्या भेटीत युतीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले होते. भाजपचे नेते सकारात्मक होते. नंतर उद्धव ठाकरेंकडूनच त्यावर प्रतिसाद आला नाही. त्यात भाजपच्या बारा आमदारांवरील निलंबनाची कारवाई, मुंबईत लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले असताना मुख्यमंत्री म्हणून शिष्टाचार पाळला न जाणे, आजारी असल्याचे कारण सांगणे आणि शिवसेनेच्या वयोवृद्ध महिला कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी जाहीर भेटणे यामुळे कटुता वाढली.

- युतीसाठी प्रयत्न केव्हा सुरू झाले?

खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी, भाजपशी युतीसाठी तुम्हीही प्रयत्न करा असे सांगितल्यानंतर पक्षाचे नेते अनिल देसाईंनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधणे सुरू केले होते. तर अरविंद सावंत म्हणाले की, मी मंत्री राहिलो असल्याने माझे भाजपच्या मंत्र्यांशी संबंध आहेत त्यांना भेटून युतीसाठी प्रयत्न करतो. मागील आठवड्यापासूनच युतीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. आम्ही केलेला हा तिसरा आणि उघड प्रयत्न होता.

- या सर्व घटनाक्रमात दोष कोणाचा?

उद्धव ठाकरे अजूनही संजय राऊत असेल किंवा आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यानुसार काँग्रेसला, विशेषतः राष्ट्रवादीला सोडायला तयार नाही.

याचे उदाहरण म्हणजे शिरूरमधून ‘राष्ट्रवादी’च्या अमोल कोल्हेंसाठी शिवाजीराव आढळराव पाटलांना पुण्यातून लढण्यासाठीचे किंवा मावळमध्ये पार्थ पवारांच्या तयारीचा प्रस्ताव आल्यास यावर ‘विचार करू’ असे संजय राऊत यांचे सांगणे, यावरून अनेक बाबी स्पष्ट होतात. ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार पराभूत झाले त्याच मतदारसंघांची मागणी होणे आणि शिवसेनेकडून त्याचा विचार होणे यामुळे अस्वस्थता वाढली होती.

- कटुता विसरून दोन्ही बाजू एकत्र येतील?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता फार पुढे गेले आहेत. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे सुरू आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजू एकत्र येऊ शकतील. एखादी सकारात्मक घटना घडेल आणि दोन्ही बाजू एकत्र येतील. सर्वांनी एकत्र यावे हीच आमची भावना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आम्ही प्रस्ताव नेला होता की ठाकरे कुटुंबाचा सन्मान कायम राहावा. पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी करावे आणि सरकारचे नेतृत्व शिंदेंनी करावे. ते जमले नाही. परंतु, भविष्यात त्यावर सकारात्मक काहीतरी होईल, अशी अपेक्षा आहे.

- यासाठी काही अटी आहेत काय?

अशी अट काहीही नाही, फक्त उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. एकीकडे भाजप शिवसेना युतीसाठी प्रयत्न करायला सांगतात आणि दुसरीकडे संजय राऊतांना ‘यूपीए’सोबतच्या पक्षांच्या बैठकीला जायला सांगतात. ज्याप्रमाणे तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी अशा बैठकांना जाणे टाळतात, तशीच भूमिका उद्धव ठाकरेंनीही घ्यावी हा आमचा आग्रह होता.

- निवडणूक आयोगाकडे काही पत्र दिले आहे का?

निवडणूक आयोगाला कालच पक्षातर्फे (शिंदे गट) पक्षाच्या निवडणूक चिन्हासाठी बहुसंख्य खासदारांचे मत महत्त्वाचे आहे. सर्वाधिक खासदार ज्या बाजूला तिकडे निवडणूक चिन्ह मिळणार असल्याने गटनेते पदातील बदलाची बाब निर्णायक होती. आता ही प्रक्रिया (निवडणूक चिन्ह मिळविण्याची) मार्गी लागू शकेल.

- संसदेतील शिवसेना कार्यालयावर दाव्याचा तुमचा प्रयत्न आहे?

यात काहीही तथ्य नाही. केवळ बारा खासदारांच्या वेगळ्या गटाला मान्यता मिळाली असती तर शिवसेनेच्या कार्यालयाचा प्रश्न उद्भवला असता. परंतु लोकसभाध्यक्षांनी आपल्याला सर्व १९ खासदारांचा गटनेता म्हणून मान्यता दिली असल्याने हा प्रश्न उद्भवत

नाही. पक्षाचे उर्वरित खासदार हे ज्येष्ठ सहकारी आहेत. भाजपशी पुन्हा युती करण्याबाबत झालेल्या सर्व बैठकांमध्ये तेही सहभागी होते त्यामुळे सर्व एकत्रित आहेत.

Web Title: Rahul Shewale Statement Thackeray Shinde Rapprochement Possible In Future

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..