रेल्वेचा चिनी कंपनीला झटका

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 22 August 2020

रेल्वेने चिनी कंपनीचा सहभाग असलेला संपूर्ण करारच आता रद्द करण्याचा व पुढील आठवड्यात नव्या नियमांनुसार भारतीय कंपनीला प्राधान्य देण्याची अट असलेले टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- रेल्वेने चीनला आणखी एक मोठा झटका देताना ‘४४- सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेगाड्या बनविण्याचे कंत्राट रद्द केले आहे. मागील महिन्यातच चीनबरोबर भागीदारी असणाऱ्या सीआरआरसी जेव्ही कंपनीला या प्रकल्पाचा ठेका मिळाला होता. रेल्वेने चिनी कंपनीचा सहभाग असलेला हा संपूर्ण करारच आता रद्द करण्याचा व पुढील आठवड्यात नव्या नियमांनुसार भारतीय कंपनीला प्राधान्य देण्याची अट असलेले टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

महात्मा गांधींच्या चष्म्यासाठी लागली कोट्यवधींची बोली; वाचा रक्कम
 

वंदे भारत प्रकल्पासाठी जागतिक टेंडर काढण्यात आली होती व त्या स्पर्धेत फक्त चीनच्या सीआरआरसी कंपनीचाच दावा कसोट्यांवर टिकणारा ठरल्याने त्यांचे टेंडर मंजूर झाले होते. या प्रकल्पांतर्गत ४४- सेमी हायस्पीड रेल्वेगाड्यांची निर्मिती होणार होती व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. चेन्नईतील इंटग्रियल कोच फॅक्‍टरीमध्ये हे काम होणार आहे.

भारतीय कंपनीशी भागीदारी

सीआरआरसी कार्पोरेशन लिमिटेड ही चीनची सरकारी कंपनी आहे. ही कंपनी गुडगावातील पायोनियर फिल मेड प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीबरोबर भागीदारी करून रेल्वेगाड्यांची निर्मिती करणार होती. आता रेल्वेने हा ठेकाच रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या १८ डब्यांच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद् घाटन केले होते. देशात सध्या २ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत.

धक्कादायक! कर्मचाऱ्याचा मृतदेह झाकून, सुपरमार्कट ठेवलं सुरुच

दरम्यान, लडाखच्या गलवान भागात 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने 59 चिनी अॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही चिनी कंपनीच्या गुंतवणूकीस मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला. त्यात आता रेल्वेनेही चिनी कंपनीला कंत्राट नाकारलं आहे. त्यामुळे भारत चीनविरोधात आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway big decision on Chinese company