महाराष्ट्रात धावणार पाच इंटरसिटी एक्स्प्रेस; देशात आणखी 39 स्पेशल ट्रेन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

हळूहळू स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येत आहेत. नव्याने 39 स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. 

नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता हळूहळू स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येत आहेत. नव्याने 39 स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.  रेल्वे मंत्रालयानं या रेल्वेंची यादी जाहीर केली असून अद्याप तारीख घोषित केलेली नाही. नव्या 39 रेल्वे सुरु करण्याबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

रेल्वे बोर्डाने विभागांना 39 ट्रेन सुरु कऱण्यास परवानगी दिली आहे. या रेल्वे सेवा कधी सुरु करण्यात येतील याची माहिती लवकरच देऊ असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या 39 ट्रेन्समध्ये मुंबईतून एलटीटी, बांद्रा, मुंबई सेंट्रल इथून आणि पुणे, नागपूर इथूनही एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. 

हे वाचा - रेल्वेने आरक्षणासंबंधी बदलले नियम; जाणून घ्या माहिती

महाराष्ट्रात स्पेशल ट्रेन
महाराष्ट्रात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरपासून मुंबई, नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर इथून पाच स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या सर्व ट्रेन या आरक्षित असणार आहेत. तसंच प्रवाशांना कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करणं बंधनकारक असेल. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य असेल. याबाबत प्रवाशांना रेल्वेनं सूचना केल्या आहेत.

तेजस पुन्हा सुरू
देशातील कॉर्पोरेट सेक्टरमधील पहिली ट्रेन तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. आयआरसीटीसीकडून या व्हीआयपी ट्रेनचं बूकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. एक वर्षापूर्वी लखनऊ ते दिल्लीसाठी तेजस सुरू करण्यात आली होती. अत्याधुनिक सुविधा असलेली ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय अशी ट्रेन आहे की जी उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देते.

हे वाचा - खुशखबर : भारतीयांनी शोधला कोरोनावरील उपचार; ट्रायलला मिळाली परवानगी

आरक्षण प्रक्रियेत बदल 
रेल्वेने आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये थोडासा बदल केला आहे. रेल्वेचा दुसऱा रिझर्वेशन चार्ट ट्रेन सुटण्याच्या आधी 30 मिनिटे तयार होणार आहे. सध्या कोरोनाच्या काळात हा चार्ट दोन तास आधी तयार केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार्टच्या वेळेबाबत बदल करताना रेल्वेनं दुसरा रिझर्व्हेशन चार्ट हा रेल्वे सुटण्याच्या दोन तास आधी तयार करण्याचं निश्चित केलं होतं. मात्र 10 ऑक्टोबरपासून पुन्हा या नियमात बदल होणार आहे. त्यामुळे यापुढे रिझर्व्हेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या 30 मिनिटे अगोदर तयार होईल. तसंच दुसरा चार्ट तयार होण्याआधी तिकिट बूकिंगची ऑनलाइन सुविधा ऑनलाइन आणि पीआरएस तिकिट काउंटरवर उपलब्ध असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Board gave approval to zones for 39 new trains